वेलिंग्टन -येथील बेसिन रिझर्व्हवर आजपासून सुरू झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीत पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे पहिल्या दिवशी फक्त ५५ षटके खेळवण्यात आली असून त्यात भारताने ५ गड्यांच्या मोबदल्यात १२२ धावा केल्या आहेत.
हेही वाचा -रोहित शर्मा झाला उतावीळ, जाणून घ्या कारण
नाणेफेक जिंकून यजमान संघाने भारताला प्रथम फलंदाजीला बोलावले. सलामीवीर पृथ्वी शॉ पाचव्या षटकात माघारी परतला. टिम साऊथीने त्याला १६ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर सलामीवीर मयंक अगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनुभवी पुजारा ११ धावांवर बाद झाला. आज कसोटी पदार्पण केलेल्या काईल जेमिसनने पुजाराच्या रूपात पहिला बळी मिळवला. त्यानंतर, जेमिसनला विराटच्या रूपात दुसरा बळी मिळाला. विराटने २ धावा केल्या.
यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि अगरवालने चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर, दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच ट्रेंट बोल्टने अगरवालला ३४ धावांवर झेलबाद केले. हनुमा विहारीही ७ धावांवर माघारी परतला.
भारताची अवस्था बिकट असताना रहाणेने किल्ला लढवला. पहिला दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो १२२ चेंडूत ४ चौकारांसह ३८ धावांवर तर, यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत १० धावांवर फलंदाजी करत आहे. न्यूझीलंडकडून काईल जेमिसनने सर्वाधिक ३ बळी मिळवले. तर, टिम साऊथी आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी १ गडी बाद केला.