मुंबई - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात जिंकला. अहमदाबादमध्ये झालेल्या या डे-नाईट सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून धुव्वा उडवला. दरम्यान, ५ दिवसाचा कसोटी सामना दोन दिवसात संपल्याचं अनेकदा घडलं आहे.
अहमदाबाद डे-नाईट कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यानंतर लीच-रुट यांच्या फिरकी माऱ्यासमोर भारताचा डाव गडगडला आणि भारतीय संघ पहिल्या डावात १४५ धावांपर्यंत मजल मारू शकला. तेव्हा दुसऱ्या डावातही इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीसमोर ढेपाळला. अश्विन-अक्षर जोडीने इंग्लंडला ८१ धावांत गुंडाळले आणि भारताला विजयासाठी ४९ धावांचे आव्हान मिळाले. तेव्हा रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने नाबाद राहत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तिसऱ्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने ११, अश्विन याने ७ आणि वॉशिंगटन सुंदर आणि इशांत शर्मा यान प्रत्येकी एक-एक बळी घेतला.