नवी दिल्ली - हिटमॅनच्या टोपण नावाने ओळखला जाणाऱ्या रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीवीर म्हणून दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेत संधी मिळाली. या संधीचे सोने करत रोहित या मालिकेत धावांचा पाऊस पाडत आहे. रोहितने मालिकेतील पहिल्या सामन्यात दोनही डावात शतक ठोकले. तर तिसऱ्या सामन्यात तो द्विशतकाच्या जवळ आहे. रोहितने या मालिकेत सलामीवीर म्हणून आतापर्यंत ५००+ धावा केल्या आहेत. रोहितच्या या दमदार खेळींमुळं अन्य दोन भारतीय सलामीवीराचे टेस्ट करियर धोक्यात आले आहे.
आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माने आतापर्यंत तीन शतकं ठोकली आहेत. तसेच त्याने या मालिकेत जवळपास १४४ च्या सरासरीने धावा केल्या आहे. रांचीतील सामन्यानंतर त्यांची सरासरीत आणखी वाढ होऊ शकते. त्यांच्या या दमदार प्रदर्शनांमुळे भारतासाठी सलामी दिलेले शिखर धवन आणि केएल राहुलचे टेस्ट करियर धोक्यात आले आहे. सध्य स्थिती पाहता रोहितने सलामीला आपले स्थान पक्के केले असून शिखर धवन आणि केएल राहुलचे परतीचे दरवाजे बंद केले आहेत.