ऑकलंड - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत असून या मालिकेत भारतीय संघाने २-० अशी मजबूत आघाडी घेतली आहे. भारतीय संघाने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला तर दुसऱ्या सामन्यात सांघिक खेळ करत बाजी मारली. भारताने हा सामना गोलंदाजांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ७ विकेट राखून जिंकला. दरम्यान, भारतीय संघाला मालिका विजयासह इतिहास रचण्याची नामी संधी आहे.
भारतीय संघाला न्यूझीलंडच्या धरतीवर अद्याप टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. याआधी भारतीय संघाने २००८-०९ मध्ये न्यूझीलंडचा दौरा केला होता. न्यूझीलंडने या दौऱ्यातील टी-२० मालिकेत २-० ने बाजी मारली होती. त्यानंतर भारतीय संघ २०१८-१९ या साली न्यूझीलंड दौऱ्यावर गेला. या दौऱ्यातही भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला होता.