ब्रिस्बेन - ब्रिस्बेन कसोटी सामन्यात ६१ षटकांच्या आत भारताचा अर्धा संघ बाद झाला. तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्राखेर नाबाद असलेली मयांक अगरवाल आणि ऋषभ पंत ही जोडी दुसऱ्या सत्रात फलंदाजीला उतरली. मात्र दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर मयांक बाद झाला. त्याला जोश हेजलवूडने झेलबाद केले. मयांकचा झेल ३८ धावांवर दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने घेतला.
मयांक बाद झाल्यानंतर ऋषभ पंतदेखील (२३) बाद झाला. त्याची विकेट हेझलवूडनेच घेतली. भारताने ६८ षटकात ६ बाद १९५ धावा केल्या आहेत. भारताकडून सुंदर ८ धावांवर आणि शार्दुल ठाकूर १२ धावांवर फलंदाजी करत आहे. भारत अद्याप १६८ धावांनी पिछाडीवर आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात खराब झाली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे ही अनुभवी जोडी पहिल्या सत्रात माघारी परतली आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सर्व आशा ऋषभ पंत आणि मयांक अगरवाल यांच्यावर होती. पण दोघेही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले.