दुबई - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना १० गडी राखून जिंकत ४ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. तसेच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याच्या उद्दिष्टाने आणखी एक पाऊल टाकले. दुसरीकडे इंग्लंडचा या पराभवानंतर, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या स्वप्नांना सुरूंग लागला. आता जेतेपदाच्या सामन्यात न्यूझीलंडचा मुकाबला करण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ शर्यतीत राहिले आहेत.
भारताने अहमदाबाद येथील डे-नाईट कसोटी सामना जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत ४९० गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. या विजयासह भारताच्या विजयाची टक्केवारी ७१% अशी झाली आहे. तर इंग्लंडची टक्केवारी ६४.१ इतकी झाली असून ते चौथ्या क्रमांकावर कायम आहेत.
भारतीय संघ जरी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थानी असला तरी ते अद्याप अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेले नाहीत. त्यांना अजूनही चौथ्या कसोटीच्या निकालावर अवलंबून राहावं लागणार आहे.