सिडनी- भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. आता उपांत्य फेरीत भारताचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या संघात होईल. भारताचा सामना ५ मार्चला होणार आहे. जर गुरूवारी होणाऱ्या या सामन्यात पावसाने हजेरी लावली तर भारतीय संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल.
भारतीय संघाने 'अ' गटातून सर्व म्हणजे चारही सामने जिंकले आहेत. या गटातून भारतीय संघ ०.९७९ च्या नेटरेटने ८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. या कारणाने जर इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल होईल आणि इंग्लंडचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात येईल. दुसरीकडे जर पावसामुळे दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांचा सामना रद्द झाला तर दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यात पोहोचेल. यामुळे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो.
दरम्यान उपांत्य फेरीच्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार गुरूवारी सिडनीत पावसाची दाट शक्यता आहे. सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे.