दुबई - पाकिस्तानविरुद्धचा बॉक्सिंग डे कसोटी सामना १०१ धावांनी जिंकत न्यूझीलंडने दोन सामन्याच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडच्या या विजयाने आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. न्यूझीलंडच्या विजयाचा ऑस्ट्रेलियाला फटका बसला आहे.
पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्याचा निकाल लागण्याआधी आयसीसी कसोटी रँकिंगमध्ये न्यूझीलंडचा संघ ऑस्ट्रेलियासोबत गुणतालिकेत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होता. भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केला. तर दुसरीकडे न्यूझीलंडने पाकिस्तानवर विजय मिळवला. यानंतर न्यूझीलंडचा संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी घसरला आहे.
असा रंगला सामना
न्यूझीलंडकडून पहिल्या डावात कर्णधार केन विल्यमसनने १२९ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ४३१ धावा धावफलकावर लावल्या. यात रॉस टेलर, हेन्री निकोलस आणि वीजे वॉटलिंग यांच्या अर्धशतकांचा देखील समावेश आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या डावात ४ गडी बाद केले. यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांत आटोपला. तेव्हा न्यूझीलंडला पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी मिळाली. न्यूझीलंडने आपला दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित करत पाकिस्तानसमोर विजयासाठी ३७२ धावांचे आव्हान ठेवले होते.
अखेरच्या दिवशी फवाद आलम आणि मोहम्मद रिजवान या जोडीने न्यूझीलंडच्या गोलंदाजीचा धैर्याने सामना केला. पण ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पाकिस्तानच्या फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. अखेर पाकिस्तानचा संघ २७१ धावा करू शकला. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात २१ धावा करणाऱ्या केन विल्यमसनला सामनावीरच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
हेही वाचा -फवाद आलम...तब्बल ११ वर्षांनी शतक ठोकणारा पाकिस्तानी फलंदाज
हेही वाचा -डेव्हिड वॉर्नरची ऑस्ट्रेलिया संघात वापसी; जो बर्न्सला वगळलं