मुंबई - आयसीसीने २०२१ पासून महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू असा नवा पुरस्कार सुरू केला आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा या पुरस्काराचा पहिला मानकरी ठरला आहे.
जानेवारी महिन्यात भारतीय संघ, ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळत होता. या मालिकेत ऋषभ पंतने शानदार कामगिरी केली. पंतने जानेवारी महिन्यात ४ डावात ८१.६६ च्या सरासरीने २४५ धावा केल्या. तसेच त्याने ४ झेल टिपले. यात त्याला एका सामन्यात सामनावीराचा किताबही मिळाला. त्याच्या याच कामगिरीमुळे त्याला जानेवारी २०२१ मधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. आयसीसीच्या मतदान समितीने आणि चाहत्यांनी मिळून या पुरस्कारासाठी पंतची निवड केली.
दरम्यान, आयसीसी दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील ३ सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं देते. खेळाडूची मैदानातील कामगिरी तसेच विक्रम या साऱ्याचा विचार करून या तीन खेळाडूंची निवड केली जाते. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी आयसीसीच्या मतदान समितीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकार असतात. चाहत्यांना आयसीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर या पुरस्कारासाठी आपले मत नोंदवता येते. विजेत्या खेळाडूंचे नाव दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर करण्यात येते.
हेही वाचा -उत्तराखंड हिमप्रलय : बचावकार्यासाठी रिषभ पंतने दिले एका सामन्याचे मानधन
हेही वाचा -IND vs ENG : भारताला फॉलोऑन न देता इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय