मुंबई - माजी भारतीय वेगवान गोलंदाज अजित आगरकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मुख्य निवडक पदासाठी अर्ज भरला आहे. त्याच्याशिवाय इतर ७ जणांनीही या पदासाठी मंडळाकडे अर्ज पाठवले आहेत. यामध्ये माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, नयन मोंगिया आणि प्रसिद्ध समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचा समावेश आहे. २४ जानेवारी ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती.
हेही वाचा -आयसीसी कसोटी क्रमवारी : विराट अव्वल, तर रहाणेची आगेकूच
माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांच्याऐवजी बीसीसीआयने १८ जानेवारी रोजी अर्ज मागवले होते. या दोघांचा कार्यकाळ यावर्षी संपला आहे. निवड समितीचे उर्वरित तीन सदस्य सरनदीप सिंग, जतिन परांजपे आणि देवांग गांधी समितीमध्येच कार्यरत असतील. त्यांचा कार्यकाळ २०२० च्या शेवटी संपेल.
४२ वर्षीय आगरकरने यापूर्वी मुंबई वरिष्ठ निवड समितीच्या प्रमुखपदी काम केले आहे. त्याने भारताकडून २६ कसोटी, १९१ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांमध्ये तो तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने २८८ बळी घेतले आहेत. अनिल कुंबळेने ३३४ तर, जवागल श्रीनाथने ५१५ बळी घेतले आहेत.