नवी दिल्ली - भारतीय व्हीलचेयर क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि सध्या उत्तराखंडचा कर्णधार राजेंद्रसिंग धामी आर्थिक संकटात सापडला आहे. कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी राजेंद्रसिंगला दगड फोडून मजुरी करावी लागत आहे.
या कामापूर्वी, राजेंद्रसिंग मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत होता. मात्र, लॉकडाऊनमुळे मुलांनीही प्रशिक्षणाला येणे बंद केले आहेत. घरात पैसे नसल्याचे या मुलांच्या पालकांचे म्हणणे आहे.
वयाच्या तिसऱ्या वर्षी राजेंद्रसिंगला अर्धांगवायू झाला. आता तो 90 टक्के अपंग आहे. त्याने क्रिकेटच्या मैदानावर बरेच पुरस्कार जिंकले आहेत. याशिवाय त्याने एमए आणि बीएडची पदवी देखील मिळवली आहे. मात्र, इतके असूनही आणि देशाचे प्रतिनिधित्व केलेल्या राजेंद्रसिंगला शासनाकडून कोणताही आधार मिळालेला नाही.
उत्तराखंड व्हीलचेयर संघाचे नेतृत्व करताना मलेशिया, बांगलादेश आणि नेपाळसारख्या देशांचा दौरा करणाऱ्या राजेंद्रसिंगने म्हटले, ''काही महिन्यांतील लॉकडाऊनमुळे परिस्थिती कठीण झाली आहे. माझे आई वडील वृद्ध आहेत. मला एक बहीण आणि धाकटा भाऊ आहे. माझा भाऊ गुजरातमधील हॉटेलमध्ये काम करायचा. पण त्याची नोकरीही गेली आहे. म्हणून मी मनरेगा योजनेंतर्गत माझ्या गावात काम करण्याचे ठरवले.''
मजुरी करावी लागत असली तरी राजेंद्रसिंगचे मन खचलेले नाही. या समस्येचे निराकारण होईल, असा त्याचा ठाम विश्वास आहे. "पोट भरण्यासाठी कोणतीही गोष्ट करण्यात काही चूक नाही. मी मनरेगामार्फत काम करणे निवडले. त्यामुळे मला माझ्या घराजवळील काम मिळते. ही एक अवघड वेळ आहे. मी त्यावर मात करू शकतो, हे मला माहित आहे'', असेही राजेंद्रसिंगने हसत एका वृत्तसंस्थेला सांगितले.