केपटाऊन - डेव्हिड मलान आणि जोस बटलर यांनी दुसर्या गड्यासाठी केलेल्या भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या टी-२० सामन्यात पराभूत केले. या विजयासह तीन सामन्यांची टी-२० मालिका इंग्लंडने ३-० अशी खिशात घातली. डेव्हिड मलानने नाबाद ९९ तर, जोस बटलरने नाबाद ६७ धावा करत इंग्लंडचा विजय सोपा केला.
हेही वाचा -विराटचा वनडेत भीमपराक्रम, क्रिकेटच्या देवाला टाकले मागे
प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने रासी वॅन डर डुसेन (नाबाद ७४) आणि फाफ डु प्लेसिस (नाबाद ५२) यांच्या १२७ धावांच्या भागिदारीमुळे २० षटकांत ३ बाद १९१ धावा केल्या. यजमानांसाठी हे लक्ष्य कठीण ठरले नाही. मलान आणि बटलर यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर इंग्लंडने कोणत्याही अडचणीशिवाय हे आव्हान पार केले.
मलानने ४७ चेंडूत डावात ११ चौकार आणि ५ षटकार ठोकले. बटलरने ४६ चेंडूंचा सामना केला आणि ३ चौकार, ५ षटकार ठोकले. दक्षिण आफ्रिकेने दिलेले आव्हान मलान ९९ धावांवर असतानाच पूर्ण झाल्याने त्याला शतक करता आले नाही. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ९९ धावा करणारा एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. आधी ऍलेक्स हेल्स आणि ल्यूक राईट यांनी आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये ९९ धावा केल्या होत्या.
आता दोन्ही संघ तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत आमनेसामने असतील.