मुंबई - 'राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या सारख्या खेळाडूंना आपल्या कारकीर्दीत हवी तशी ओळख मिळाली नाही', असे मत स्थानिक क्रिकेटला नुकताच रामराम करणाऱ्या वसिम जाफरने मांडले आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाफरने हा उलगडा केला. वसिमने प्रथम श्रेणीमध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. तो रणजी करंडक स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा एकमेव फलंदाज आहे.
हेही वाचा -भारताच्या १३ कुस्तीपटूंना कोरोनाचा फटका
आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा असणाऱया जाफरने क्रिकेटच्या बदललेल्या काळाबद्दल सांगितले.'तुम्ही जर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत असाल तरच तुमची कदर केली जाते. क्रिकेटमध्येही आता काळ बदलला आहे. माझे असे अजिबात म्हणणे नाही की पुजाराचा आदर केला जाणार नाही, पण तो सध्याच्या घडीला तो फक्त कसोटी क्रिकेट खेळतोय. माझ्या काळातही द्रविड आणि लक्ष्मणसारख्या खेळाडूंना हवी तशी ओळख मिळाली नाही', असे जाफरने म्हटले आहे.
'इंडियन प्रीमियर लीगमुळे (आयपीएल) तरुणांना संधी मिळत आहे. परंतु घरगुती क्रिकेटकडे दुर्लक्ष करू नये. जे खेळाडू यामध्ये चांगली कामगिरी करीत आहेत त्यांना त्यांचा हक्क नक्कीच मिळायला हवा', असेही जाफरने म्हटले आहे. जाफरला रणजीचा सचिन तेंडुलकर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या विक्रम केला. तर जाफरने स्थानिक क्रिकेटमध्ये २० हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. ४१ वर्षीय जाफर १५० रणजी सामने खेळणारा एकमेव भारतीय खेळाडू आहे.