मुंबई -शहरातील ड्रगन फ्लाय क्लबवर पोलिसांनी छापा टाकला. यात भारतीय संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनासह बॉलीवूड स्टारवर देखील कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत नाईट कर्फ्यू जाहिर करण्यात आला असताना, ही कारवाई करण्यात आली. राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मुंबई पोलिसांनी काल सोमवारी उशिरा रात्री सुरू असलेल्या ड्रगन फ्लाय क्लबवर छापा टाकला. या क्लबमध्ये सुरेश रैनासह अनेक जण पार्टी करताना दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी सुरेश रैनासह ३४ जणाविरोधात कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला.
मुंबईत नाईट क्लबवर पोलिसांचा छापा... दरम्यान, गुन्हा दाखल करण्यात आलेल्यामध्ये क्लबमधील कर्मचाऱ्यांचा देखील समावेश आहे. यातील काही जण दिल्ली आणि पंजाबमधील आहेत. कारवाईदरम्यान काही जण मागील दरवाजातून पळून गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्यांचा देखील शोध घेत आहेत.
सुरेश रैनाची सुटका
कोरोनाशी संबधित नियमांचे पालन न केल्याने तसेच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रैनाची जामीनवर सुटका करण्यात आल्याचे समजते.
सुरेश रैनाची या प्रकरणी प्रतिक्रिया
सुरेश रैनाच्या मॅनेजमेंट टीमकडून एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. यामध्ये त्यांनी, रैना हा एका शूटसाठी मुंबईत आला होता, अशी माहिती दिली आहे. एका मित्राने डिनरसाठी बोलावल्यामुळे रैना ड्रॅगन फ्लाय नाइट क्लमध्ये गेला होता. त्याला स्थानिक वेळा आणि प्रोटोकॉलची माहिती नव्हती, असेही त्याच्या मॅनेजमेंट टीमने सांगितले आहे. पुढे त्यांनी, रैनाने या घटनेबाबत खेद व्यक्त केल्याचे सांगत, तो नेहमीच प्रशासनाकडून आखून दिलेल्या नियमांचे पालन करत असून भविष्यातही करत राहील, असे सांगितलं आहे.
हेही वाचा -बॉक्सिंग डे कसोटी : सामनावीर खेळाडूला मिळणार 'जॉनी मुलघ' पदक
हेही वाचा -'भारतासाठी चॅम्पियनशिप बेल्ट जिंकणे हे माझे स्वप्न'', रितू फोगाटची ईटीव्ही भारतला खास मुलाखत