मुंबई- कोरोनाचा विळखा दिवसागणिक घट्ट होताना दिसत आहे. जगभरात यामुळे भीतीचे वातावरण आहे. भारतात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या आवाहनासोबत मोदींनी कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सढळ हाताने मदत करा, असे आवाहनही केले आहे. मोदींच्या या आवाहनाला सर्व क्षेत्रातून प्रतिसाद मिळत आहे. भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जाडेजा हिनेदेखील कोरोनाग्रस्तांना मदत केली आहे. याशिवाय हॉकी इंडियानेही मदतीचा हात पुढे केला आहे.
रिवाबा जडेजा हिने कोरोनाग्रस्तांसाठी २१ लाखांची मदत केली आहे. त्यासोबत तिने, नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन देखील केले आहे. रिवाबाने ही मदत पंतप्रधान निधीमध्ये जमा केली आहे.
हॉकी इंडिया ही कोरोनाग्रस्तासाठी पुढे आली आहे. त्यांनी २५ लाखांचा निधी जाहीर केला आहे. दरम्यान, याआधी अनेक कलाकार, व्यापारी मंडळी, उद्योगपती, क्रीडापटू, संस्था आणि सर्वसाधारण जनता मदतीसाठी पुढे सरसावली आहे.