सिडनी - ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळताना न्यूझीलंड संघाचा कसोटी मालिकेत ३-० ने सफाया केला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची साथ मिळाली. याच जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय साकारला. दमदार कामगिरी केलेल्या मार्नस लाबूशेनला सामनावीर तसेच मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.
ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडी मिळून न्यूझीलंडला ४१६ धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (१११) आणि मार्नस लाबुशेनने (५९) दमदार खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात, न्यूझीलंड संघ सपशेल अपयशी ठरला. नॅथन लिओनने ५० धावांत ५ गडी बाद करत न्यूझीलंडची फलंदाजी कापून काढली. तर त्याला मिचेल स्टार्कने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली. मार्नस लाबुशेनने या मालिकेसह मागील पाच सामन्यात चांगली छाप सोडली. त्याने ५ सामन्यात ८९६ धावा केल्या.