नवी दिल्ली Bishan Singh Bedi Life : आपल्या आर्म बॉल आणि फ्लाईट डिलेव्हरीनं जगभरातील फलंदाजांना चकमा देणाऱ्या बिशन सिंग बेदी यांचं व्यक्तीमत्व त्यांच्या गोलंदाजी इतकंच कोड्याचं होतं. ते आपल्या काही निर्णयांमुळं आणि स्पष्टवक्तेपणामुळं कायम वादात राहिले. जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या बेदी यांचं सोमवारी (२३ ऑक्टोबर) वयाच्या ७७ व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. यासह अनेक दशकांपासून भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यात अमूल्य योगदान देणाऱ्या एका स्टारला जागतिक क्रिकेटनं निरोप दिला.
अमृतसर येथे जन्म : बिशन सिंग बेदी यांचा जन्म २५ सप्टेंबर १९४६ रोजी पंजाबमधील अमृतसर शहरात झाला. त्यांनी जवळपास १२ वर्षे भारतीय गोलंदाजीची धुरा सांभाळली. ते भारताच्या त्या फिरकी चौकडीचा भाग होते ज्यात इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश होता. हा कलात्मक डावखुरा फिरकीपटू समकालीन फलंदाजांसाठी नेहमीच एक न समजणारं कोडं राहिला. बेदी चेंडू शक्य तितक्या उंचीवरून फेकत असे. तसेच त्यांचं चेंडूवरील नियंत्रणही अप्रतिम होतं.
बिशन सिंग बेदी यांची कारकीर्द : बिशन सिंग बेदी यांनी ३१ डिसेंबर १९६६ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्याच्या ईडन गार्डन्स येथे कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. ते १९७९ पर्यंत भारतीय संघाचा भाग होते. या दरम्यान त्यांनी ६७ कसोटी सामने खेळले ज्यात त्यांनी २८.७१ च्या सरासरीनं २६६ विकेट घेतल्या. बेदींच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल १५६० विकेट्स आहेत. बेदी यांनी वयाच्या १५ व्या वर्षी १९६१-६२ रणजी ट्रॉफीमध्ये उत्तर पंजाबसाठी पदार्पण केलं. मात्र नंतर ते दिल्लीकडून खेळले. ते इंग्लंडमध्ये नॉर्थम्प्टनशायर संघाकडून काउंटी क्रिकेटही खेळले आहेत.
प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवडकर्ता राहिले : बेदी यांनी २२ सामन्यांमध्ये भारताचं कर्णधारपद भूषवलं. त्यापैकी भारतीय संघानं ६ सामने जिंकले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बेदी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि राष्ट्रीय निवडकर्ता देखील राहिले. १९९० मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंड दौऱ्यात बेदी काही काळ भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक होते. ते मनिंदर सिंग आणि मुरली कार्तिक यांच्यासारख्या अनेक प्रतिभावान फिरकीपटूंचे मार्गदर्शक होते.