मुंबई - आपल्या देशात क्रिकेटला अधिक प्राधान्य असल्याने मातीतल्या खेळाकडे सर्वांचे दुर्लक्ष होतय हे आपण जाणतोय. ज्या खेळाने ताकद, वेग, लवचिकता, मानसिक एकाग्रता वाढते असा मातीतला खेळ मल्लखांब. अशाच मल्लखांब खेळाची कित्येक वर्षांपासून उपासना करणाऱ्या आणि कित्येक खेळाडू घडवणाऱ्या प्रशिक्षकांना छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार नुकताच घोषित झाला आहे. तसेच दादर समर्थ व्यायाम शाळेचे मल्लखांब विश्वचषकाचे स्वप्न पूर्ण होत आहे .परंतु, या खेळाकडे लोक अजूनही वळले नाहीत ही खंत आहे.
तीन दशकांपूर्वी मल्लखांब मृतप्राय बनण्यापर्यंत गेला. या खेळाला पुन्हा उर्जितावस्था आणण्याच्या दिशेने सर्व मल्लखांब संघटकांचे प्रयत्न सुरू होते. मल्लखांब आता भारतातील सर्व राज्यांमध्ये पोहोचलाय. देशाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, ग्रामीण क्रीडा स्पर्धेत मल्लखांब हा खेळ पोहोचवणे हे प्रारंभीचं ध्येय होते. तसेच या खेळाला ऑलिम्पिकपर्यंत नेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून जागतिक मल्लखांब स्पर्धा आयोजित केली जातेय. त्याद्वारे जगभरात मल्लखांब पोहोचवण्याचे ध्येय असल्याचे ज्येष्ठ मल्लखांब मार्गदर्शक उदय देशपांडे यांनी सांगितले.
१९८०च्या दशकात महाराष्ट्रातदेखील मल्लखांब हा खेळ केवळ चार-पाच जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला होता. तसेच महाराष्ट्र, गुजरात, उत्तरप्रदेश आणि मध्य प्रदेश या चारच राज्यांमध्यं अस्तित्व उरले होते. मात्र, देशपांडेसह काही संघटकांनी या खेळाच्या प्रचार-प्रसाराचा ध्यास घेऊन त्यानंतरच्या दोन-अडीच दशकात हा खेळ देशभरातील २९ राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पोहोचवण्यात योगदान दिले. या दशकापासून टीव्हीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातूनही व सरकारच्या मदतीने मल्लखांबचा प्रसार होण्यास वेग मिळाला. त्यामुळेच आता हा खेळ पुन्हा एकदा उर्जितावस्थेकडे वाटचाल करतोय, असा विश्वास व्यक्त होत आहे.
जगात सर्वात वेगाने वाढणारा पारंपरिक खेळ म्हणून ओळख असलेल्या मल्लखांबने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटविला आहे. आता जगभरातील विविध देशांत खेळल्या जाणाऱ्या या खेळातील खेळाडूंना एकत्र आणण्यासाठी मल्लखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा १६ व १७ फेब्रुवारीला मुंबईत श्री समर्थ व्यायाममंदिर येथे होत आहे. त्यासाठी मुंबईतले तसेच जर्मनी, चेक प्रजासत्ताक, बांगलादेश, स्पेन, इटली, अमेरिका, इराण, नॉर्वे, इंग्लंड, फ्रान्स, मलेशिया, सिंगापूर, जपान, व्हिएतनाम आणि यजमान भारत हे देश यात भाग घेणार आहेत आणि त्याची तयारी देखील दादर मैदानात सुरू आहे. या १५ देशांतून १५० खेळाडू व अधिकारी स्पर्धेत सहभागी होणार आहेत.