अमेझॉन प्राइम व्हिडिओ हा प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्म असून अनेक हिंदी, इंग्लिश आणि जागतिक सिनेमा प्रदर्शित करतो व त्याला अब्जावधी दर्शकांच्या पाठिंबा मिळत असतो. मराठी चित्रपट फारसे ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखविले जात नाहीत. त्याची कारणं वेगवेगळी आहेत ज्याचा उहापोह स्वतंत्रपणे करण्याची गरज आहे. परंतु कुठेतरी सुरुवात होताना दिसतेय कारण अमेझॉन प्राइम व्हिडिओ वर पहिल्यांदाच एखाद्या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होऊ घातलाय. येत्या १९ मार्च ला अमेझॉन प्राइम व्हिडिओ वर ‘पिकासो' या मराठी चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमियर होणार आहे आणि ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी समाधानाची बाब आहे असे म्हणायला हवे. ‘पिकासो’ च्या चित्रझलकीचे नुकतेच प्रसारण झाले आहे.
‘पिकासो' चित्रपटाचे पोस्टर सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधून प्रेक्षकांसमोर येणारे राष्ट्रीय पुरस्कार-विजेते अभिनेते प्रसाद ओक, बालकलाकार समय संजीव तांबे आणि अश्विनी मुकदाम यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'पिकासो' अस्वस्थ मद्यपी वडिल व मुलाच्या नात्याची उत्तम कथा सादर करतानाच कोकणातल्या लोकजीवनाची आणि तिथल्या सुप्रसिद्ध अशा दशावतार कलेची झलक दाखवते. शिलादित्य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चे दिग्दर्शन व सह-लेखन पदार्पणीय अभिजीत मोहन वारंग तसेच सह-लेखक तुषार परांजपे यांनी केले आहे. कोकणामधील दुर्गम गावातील एक तरूण विद्यार्थी गंधर्व राष्ट्रीय पातळीवरील पिकासो आर्टस् स्कॉलरशिपसाठी निवडण्यात येतो. स्पर्धेच्या विजेत्याला त्याची कला अधिक निपुण करण्यासाठी पिकासोचे जन्मस्थान स्पेन येथे जाण्याची संधी मिळते. गंधर्व, त्याची झालेली निवड आणि स्पर्धेतील प्रवेशाकरिता भरावयाच्या फीबाबत त्याच्या आईवडिलांना सांगतो. परंतु त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याकारणाने ते त्यासाठी असमर्थता दर्शवितात आणि सांगतात की त्यांना हे परवडणार नाही. पांडुरंग परिस्थितीवर मात करून स्वत:सोबतच त्याच्या मुलासाठी त्याच्या कलेला वाव देईल की नियतीसमोर नतमस्तक होईल असे प्रश्न चित्रपटातून भावनिकरीत्या हाताळण्यात आहे आहेत जे प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालतील. चित्रपटाच्या कथानकाबाबत बोलताना पदार्पणीय दिग्दर्शक व सह-लेखक अभिजीत मोहन वारंग म्हणाले, ''मला बालपणापासूनच दशावतार कलेने आकर्षून घेतले आहे. मला दशावताराला अस्सल व मूळ स्वरूपात दाखवणारा चित्रपट 'पिकासो' बरेच दिवस करायचाच होता. या चित्रपटात वास्तविकता आणण्याचा माझ्यासह प्रत्येक कलाकाराचा प्रयत्न होता आणि त्यासाठी आम्ही वास्तविक ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग केले आहे. लोककथेनुसार लोककलेचा उगम तळकोकणाच्या वालावल शहरामधील लक्ष्मी-नारायण मंदिरामधून झाला आहे, तिथे आम्ही चित्रपटाचे शूटिंग केले. या चित्रपटासोबतच आम्ही कलाकाराच्या जीवनातील दैनंदिन आव्हानांना लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. सर्जनशीलतेची समर्पक, वेदनादायी, पण समाधानकारक प्रक्रिया म्हणजे स्वत:लाच प्रश्न विचारत समस्यांचा सामना करण्याच्या नवीन पद्धतींचा शोध घेणे.''प्लॅटून वन फिल्म्सचे निर्माता शिलादित्य बोरा म्हणाले, '''पिकासो' हा चित्रपट सर्व वयोगतील व सीमांपलीकडील प्रेक्षकांना प्रेरित करेल. प्लॅटून वन फिल्म्समधील आमच्या संपूर्ण टीमला अमेझॉन प्राइम व्हिडिओसोबत सहयोग करण्याचा आणि आमच्या स्वत:च्या लहानश्या प्रयत्नांमध्ये आणि त्यांच्या वैविध्यपूर्ण कथानकांमध्ये ‘पिकासो’ सारख्या कथांचे योगदान देण्याचा आनंद होत आहे. मी भारत आणि २४० देश व प्रदेशांमधील स्ट्रिमिंग सर्विसवर या चित्रपटाचे वर्ल्ड प्रिमिअर सादर होताना पाहण्यास खूपच उत्सुक आहे.'' प्लॅटून वन फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या बॅनरअंतर्गत शिलादित्य बोराद्वारे निर्मित 'पिकासो'चा विशेष वर्ल्ड प्रिमिअर अमेझॉन प्राइम व्हिडिओवर १९ मार्च २०२१ ला होणार आहे.