तंत्रज्ञानाने आपल्यासाठी नवनवीन सुविधा निर्माण केल्या असल्या तरी ते वापरण्याचे योग्य ते भान दिले नाही हे दाखवून देताना सोशल मीडियाचा होत असलेला चुकीचा वापर यावर ‘इमेल फिमेल’ चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे. प्रलोभनाला बळी ठरलेल्या एका मध्यमवर्गीय शंतनूची गोष्ट ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून मांडण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणाऱ्या खूप व्यक्ती असतात. पण त्यांच्यासोबत भरकटत जाणारे सुजाण आणि सुशिक्षित तरुणही यांसारख्या गोष्टींना तेवढेच जबाबदार असतात हे दाखवण्याचा प्रयत्न ‘इमेल फिमेल’च्या माध्यमातून केला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे झी टॉकीजवर.
सोशल मीडीयाचा उपयोग चांगल्या कामासाठी होतोय, तेवढाच किंवा त्याहूनही खूप जास्त गैरवापर वाढतोय. ‘सोसेल तेवढंच सोशल’ असं सोशल मिडीयाच्या बाबतीत गमतीने म्हटलं जातं. सोशल मीडियाच्या वापराचा अनेकांचा फोकस सध्या चुकत चालला आहे. हाच विषय मध्यवर्ती ठेऊन सोशल मीडियाच्या आहारी जाऊन आपल्याच सदसदविवेकबुद्धीचा विसर पडलेल्या शंतनू कुलकर्णी या मध्यमवर्गीय गृहस्थाची व त्याच्या कुटुंबावर झालेल्या परिणामाभोवती ‘इमेल फिमेल’ चित्रपटाची कथा फिरते.
सोशल मिडीयावर आपण काय बोलावं आणि काय बोलू नये, मत व्यक्त करताना आणि माहिती पाठवताना योग्य ती पडताळणी न करता अनोळख्या व्यक्तीच्या चॅटिंगला न भुलणे याचे भान प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. हाच संदेश मनोरंजनाच्या माध्यमातून ‘इमेल फिमेल’ चित्रपटातून देण्यात आला आहे. मनोरंजनाला वास्तवाची जोड देत या चित्रपटातून मनोरंजनासोबत एका महत्त्वाच्या आणि गरजेच्या विषयावर भाष्य ‘इमेल फिमेल’ मधून करण्यात आलं आहे.