मुंबई -‘नचपन का त्योहार’ म्हणत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरू झालेला 'सुपर डान्सर चॅप्टर ४' सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. सुपर डान्सर चॅप्टर ४ चे परीक्षक शिल्पा शेट्टी कुंद्रा, अनुराग बासू आणि गीता कपूर हे तर चक्रावूनच गेले आहेत. अनेक स्पर्धक ऑडिशन राऊंडलाच फिनालेचे परफॉर्मन्सेस देत आहेत. अशाच एका स्पर्धकाने आपल्या निर्दोष कामगिरीने जजेसला चकित केले आहे. अशाच एका छोट्या स्पर्धकाची शिल्पा शेट्टी-कुंद्राने दृष्ट काढली आहे.
परीक्षक शिल्पा शेट्टी कुंद्राने काढली स्पर्धक फ्लोरिना गोगोईची दृष्ट!
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर 'सुपर डान्सर चॅप्टर ४' सुरू झाला आहे. या स्पर्धेत देशाच्या कानाकोपऱ्यातून स्पर्धक येतात. यामध्ये काही लहान मुलांचा देखील समावेश असतो. या सिझनमध्ये देखील आसामची एक लहान मुलगी स्पर्धक म्हणून सहभागी झाली आहे.
ही सहा वर्षांची स्पर्धक फ्लोरिना गोगोई आसामच्या जोरहाटची रहिवासी आहे. तिने आपल्या वडिलांचा टी-शर्ट घालून नृत्य केले कारण तिच्यामते तिच्या वडिलांचा टी-शर्ट तिच्यासाठी खूप लकी आहे. अप्रतिम नृत्य-सादरीकरणाने फ्लोरीनाने परीक्षकांची मन जिंकली. समर्पणाची आणि दृढनिश्चियाची पातळी पार करणाऱ्या या स्पर्धक मुलीचे गीता माँ ने कौतुक केले. अनुराग बासू यांनी देखील तिची प्रशंसा केली आणि सुपर डान्सरचे ब्रीदवाक्य ‘नचपन का त्योहार’ सार्थ ठरवल्याबद्दल लहानगीचे आभार मानले. शिल्पा शेट्टी कुंद्राने तर स्टेजवर जाऊन फ्लोरिनाची दृष्ट काढली. तिला व तिच्या नृत्याला नजर लागू नये म्हणून शिल्पाने तिला ‘काला टीका’ लावला.
‘मला माझ्या बाबांचा खूप सपोर्ट असतो. मला ही स्तुती मिळण्याचे कारण मी घातलेला माझ्या बाबांचा टी-शर्ट आहे. त्याचीच ही जादू आहे. माझे सिलेक्शन सुद्धा त्यामुळेच झाले आहे. मी खूप मेहनत करून सुपर डान्सर चॅप्टर ४ ची ट्रॉफी जिंकणार', असे आनंदी झालेल्या फ्लोरिनाने सांगितले.