कोलकाता - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि गायिका नेहा कक्कर यांच्या पाठोपाठ आता पश्चिम बंगालमधील एका महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत चक्क शिनचॅनचेही नाव आले आहे.
उत्तर बंगालमधील सिलिगुरी महाविद्यालयाच्या बीएस्सी (ऑनर्स)च्या गुणवत्ता यादीमध्ये शिनचॅन नोहारा हे नाव झळकले होते. ही बाब लक्षात येताच महाविद्यालयाने तातडीने ती यादी हटवत, सुधारित यादी आपल्या वेबसाईटवर अपलोड केली. तसेच, हे प्रकार वारंवार घडत असल्याने याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार नोंदवल्यात आल्याचेही विद्यालय प्रशासनाने सांगितले.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुणवत्ता यादी भरण्यासाठी महाविद्यालयाने एका खासगी कंपनीला कंत्राट दिले होते. मात्र, काही विद्यार्थी मुद्दाम अशी माहिती भरत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वर्ग सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या माहितीची प्रशासनामार्फत छाननी केली जाणार आहे, असे महाविद्यालयाने स्पष्ट केले.
यापूर्वी मालदामधील माणिकचक महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीमध्ये नेहा कक्करचे नाव आले होते. तर, इतर तीन महाविद्यालयांच्या गुणवत्ता याद्यांमध्ये सनी लिओनीचे नाव समोर आले होते. या चारही महाविद्यालयांनी सायबर सेलमध्ये याबाबत तक्रार नोंदवली आहे.