मालिकेबद्दलची प्रेक्षकांची ताणली गेलेली उत्सुकता शमवण्यासाठी दर रविवारी महारविवार साजरा करून करून एका तासाचे विशेष एपिसोड करणं तशी नवीन गोष्ट राहिलेली नाही. मालिकेची लोकप्रियता कायम रहावी आणि प्रेक्षकांनी सुट्टीच्या दिवशी टीव्हीसमोर जास्त वेळ बसून रहावं हा त्यामागचा उद्देश असतो. मात्र या परंपरेला छेद देत स्टार प्रवाहने आपल्या दोन मालिकांमधील मोठे प्रसंग महा'गुरुवार' मधून दाखवायचं ठरवलं आहे. आठवड्याच्या मधल्या वारी महाएपिसोड करून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.
प्रेक्षकांची उत्कंठा शमवण्यासाठी स्टार प्रवाह साजरा करणार महा'गुरुवार'
स्टार प्रवाहने आपल्या ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘अग्निहोत्र २’ या दोन मालिकांमधील मोठे प्रसंग महा'गुरुवार' मधून दाखवायचं ठरवलं आहे. आठवड्याच्या मधल्या वारी महाएपिसोड करून त्याला कसा प्रतिसाद मिळतो याची उत्सुकता आहे.
स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ आणि ‘अग्निहोत्र २’ या दोन्ही मालिका अत्यंत उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचल्या आहेत. २ जानेवारीला या दोन्ही मालिकांचे विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत आदित्य आणि श्वेताचा साखरपुडा पार पडत असतानाच दीपाच्या एण्ट्रीने साऱ्या आनंदावर विरजण पडतं. सौंदर्या इनामदारला काळ्या रंगाच्या व्यक्तींचा तिटकारा असल्यामुळे श्वेताची आई दीपा ही श्वेताची बहीण असल्याचं सत्य लपवत असते. मात्र साखरपुड्याच्या कार्यक्रमात दीपाच्या उपस्थितीतीने हे सत्य सर्वांसमोर उघड होतं. सौंदर्याला आपली फसवणूक झाल्याचा राग अनावर होतो आणि ती आदित्य-श्वेताचा साखरपुडा मोडते. बहिणीचा साखरपुडा मोडल्याची सल दीपाच्या मनात असते आणि म्हणूनच ती हे नातं पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करणार आहे. सौंदर्याचं मन बदलण्याचा दीपाचा प्रयत्न यशस्वी होणार का? याचा उलगडा २ जानेवारीच्या भागात होणार आहे.
‘अग्निहोत्र २’ मध्येही रहस्यांचा गुंता उलगडू लागलाय. वडिलांवर लागलेला मानहानीचा कलंक पुसण्यासाठी अक्षरा नाशिकच्या वाड्यातच रहाते आहे. वडिलांना निर्दोष सिद्ध करणारे एक एक पुरावे तिच्या हाती लागण्यास सुरुवात झाली असली तरी अक्षराची ही वाटचाल प्रचंड खडतर आहे. तिच्या या प्रयत्नांना यश मिळणार का? वाड्याच्या परिसरात सापडलेल्या सोन्याच्या मोहरा अक्षराच्या उत्तरांना वाट करुन देणार का? महादेव काकांचा शोध कसा लागणार? या आणि अश्या अनेक प्रश्नांची उत्तरं महागुरुवारी उलगडतील.