एकेकाळी भारत सोन्याचा धूर येणारा देश म्हणून प्रसिद्ध होता. प्रचंड सुबत्ता आणि श्रीमंत राजे आणि त्यांची अतिश्रीमंत राज्ये यांची ख्याती सर्वदूर पोहोचलेली होती. आणि त्यामुळेच प्रथम मुघल आणि नंतर इंग्रजांनी भारतावर आक्रमण करून अनेक दशके राज्य केलं आणि लुटलं. सर्वप्रथम बाबर आला आणि नंतर अनेक मुघल सम्राटांनी भारतावर राज्य केलं आणि येथील संपत्ती गिळंकृत केली. छत्रपती शिवाजी महाराज या मुघलांना पुरून उरले होते ज्यांनी अटकेपार स्वराज्याचा झेंडा रोवला होता. परंतु फितुरीने घाl केला आणि मुघलांचा विजय होत गेला, इंग्रज हात-पाय पसरेपर्यंत. अर्थातच हा सर्व इतिहास दस्तावेजीकरण केलेला आहे. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे मुघल आणि मुघल राजे हे व्हिलन नव्हते आणि आपल्या चित्रपटांतून त्यांचे उगाचच राक्षसीकरण केले जात आहे असे मत नुकतेच दिग्दर्शक कबीर खान याने व्यक्त केले आहे.
कबीर खानने बॉलिवूड हंगामा या पोर्टलशी बोलताना असे मत व्यक्त केले. त्याने खुलासा केला की तो हिंदी चित्रपटसृष्टीत मुघलांच्या मोठ्या प्रमाणावरील राक्षसीकरणामुळे नाराज आहे. तो म्हणाला की अनेक भारतीय चित्रपट निर्मात्यांनी अनेकदा त्यांच्या चित्रपटांतून मुघल शासकांचे राक्षसीकरण केले असून ते त्याला समस्याग्रस्त आणि त्रासदायक वाटते असे म्हटले आहे. त्याच्या मते मुघलांना खलनायक दर्शविण्याआधी ऐतिहासिक पुरावे सादर करणे गरजेचे आहे. त्याने मुघलांना मूळ राष्ट्रनिर्माते देखील म्हटले आहे. तो बॉलिवूड हंगामाशी बोलताना पुढे म्हणाला की, "मला हे सर्व खूपच समस्याप्रधान आणि त्रासदायक वाटते. सद्यस्थितीत असे फक्त आताच्या राज्यकर्त्यांना खुश करण्यासाठी केले जात असावे. अर्थातच, मला कळतंय की निर्मात्यांनी या विषयावर संशोधन केलंच असणार आणि तो त्यांचा दृष्टिकोन आहे. परंतु त्या विषयावर ‘दुसरा’ दृष्टिकोनही असू शकतो.”