लखनऊ -बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले आहे. मात्र, शासनाच्या नियमावलीचे पालन न केल्यामुळे तिच्याविरोधात सरोजनी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनिकावर कलम १८२, २६९ आणि २७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कनिका कपूर लंडनवरुन मुंबईत परत आल्यानंतर तिने लखनऊमध्ये झालेल्या एका पार्टीमध्ये सहभाग घेतला होता. तिच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार तिने ३ पार्ट्यांमध्ये हजेरी लावली होती. मात्र, कनिकाने सांगितले, की तिने फक्त एका गेट टूगेदरमध्ये सहभाग घेतला होता.
हेही वाचा -कनिका कपूर लखनऊच्या केजीएमयू रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये दाखल
आता तिला कोरोनाचे निदान झाले आहे. त्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बॉलिवूडमध्ये अधिकृतरित्या कोरोना पॉझिटीव्ह असलेली कनिका कपूर ही पहिलीच सेलिब्रेटी आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विलगीकरण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, गर्दीच्या ठिकाणी न जाण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मात्र, कनिकाने लंडनवरून परतल्यानंतर आयसोलेशन न करता पार्टीत सहभाग घेतला. त्यामुळे अनेकांनी तिच्यावर आक्षेप घेतला आहे.
कनिकाने सोशल मीडियावर तिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये नागरिकांना खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरत तिने कशाप्रकारे नियमांचे उल्लंघन केले आहे, त्याबद्दल खडे बोल सुनावले आहेत.
हेही वाचा -बॉलिवुडच्या प्रसिद्ध गायिकेला कोरोनाची लागण