पुणे - कोरोनाचा फटका नाट्यसृष्टी प्रमाणे तमाशाला देखील बसला आहे. सरकारने यात्रा-जत्रा उत्सव बंद करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा थेट परिणाम तमाशा कलावंतांवर झाला आहे. 'तमाशा पंढरी' म्हणुन ओळख असलेल्या नारायणगावात तमाशाची बारी ठरवण्यासाठी कोणीही फिरकत नसल्याने तमाशा फड मालक धास्तावले आहेत.
कोरोनामुळे तमाशा कलावंताच्या कलेचा तमाशा.... ग्रामीण भागात तमाशाचे फड लोकप्रिय आहे कलाकारांसोबत तमाशा पाहायला आलेले प्रेक्षकही बेभान होतात. तमाशातील गाणी आणि विनोद यांना रसिक प्रेक्षक चांगली दाद देतात. मात्र, यंदा फड रंगणं तर सोडाच पण तमाशाला सुपारीच मिळत नसल्याने तमाशा मालक चांगलेच धास्तावले. यंदा यात्रा हंगाम सुरू होण्याच्या काळात तमाशा पंढरी असलेल्या नारायणगावात तमाशाची बारी ठरवण्यासाठी येणारे गाव पुढारी फिरकत नसल्यामुळे त्याचा थेट परिणाम म्हणुन तमाशा फड मालकांच्या थाटलेल्या राहुट्या ओस पडल्या आहेत.
हेही वाचा -कोरोनाची धास्ती : पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट...बागा..सिनेमागृहे बंद
पाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात यात्रा उत्सव सुरू होतात. त्या आधी दरवर्षी साधारणपणे नारायणगाव येथे साधारणपणे 1500 सुपारी बुक होतात. त्यातून सुमारे तमाशाच्या माध्यमातून 10 ते 12 कोटींची उलाढाल होत असते. मात्र, यंदा कोरोनाच्या सावटामुळे तमाशाचा तमाशाच होऊन बसला आहे. जत्रा यात्रा उत्सव बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता फड मालक हातावर हात देऊन बसले आहेत.
गुढी उभारून या फडमालकानी यात्रेकरूंचे स्वागतही केले आणि आपल्या नव्या वर्षाच्या व्यवसायाचा शुभारंभ केला. गावच्या जत्रेत करमणूकीसाठी रात्रीच्या वेळी तमाशा ठेवण्याची परंपरा असून गावपुढारी या ठिकाणी येवून त्याचे बुकिंग करत असतात. याला 'सुपारी देणं' असेही म्हणतात. एका तमाशा फडात 150 ते 200 कलाकार काम करत असतात. यातुनच त्यांच्या संसाराचा गाडा हाकला जातो. मात्र, गेल्या 4 वर्षापासुन याच तमाशाला ग्रहण लागले आहे.
दुष्काळ, नोटबंदी, निवडणूका आणि आता कोरोना, यापुढे हे तमाशा कलावंत हतबल झाले आहेत. आता जगायचे कसेस, असा थेट सवाल फड मालक उपस्थित करत आहेत. मागील ८० वर्षांपासूनची तमाशा कलावंतांची ही परंपरा संकटात सापडली आहे. आता कोरोनामुळे हे सगळेच बंद झाले आहे. त्यामुळे शासनाने या तमाशा कलावंताच्या कलेची कदर करुन मदतीचा एक हात पुढे करण्याची गरज निर्माण झाली आहे.
हेही वाचा -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजीव गांधी प्राणी संग्रहालयासह इतर उद्याने बंद