मुंबई -छोट्या पडद्यावरुन आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या विक्रांत मेस्सीला मोठ्या पडद्यावरही चांगल्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. लवकरच तो दीपिका पदुकोणसोबत 'छपाक' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल. या चित्रपटानंतर लगेचच तो अभिनेत्री यामी गौतमसोबतही मुख्य भूमिका साकारणार आहे.
होय, विक्रांतची यामीसोबत आगामी 'गिन्नी वेड्स सन्नी' या चित्रपटात वर्णी लागली आहे. या चित्रपटाचे शूटिंग दिल्ली, नोएडा, गाजियाबाद आणि मनाली येथे होणार आहे. १ सप्टेंबर २०१९ पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल.
'डॉन', 'जोधा अकबर' आणि 'लक बाय चांस' यांसारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम करणारे पुनीत खन्ना या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असणार आहे.
या चित्रपटाच्या कथेबाबत सांगायचे झाले, तर हा चित्रपट अरेंज मॅरेजवर आधारित आहे. गिन्नी जेव्हा सन्नीला रिजेक्ट करते, त्यानंतर काय होते, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
विक्रांतने बॉलिवूडच्या बऱयाच चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली आहे. रणवीर सिंगसोबत तो 'लुटेरा' चित्रपटात दिसला होता. तसेच कोंकणा सेन शर्मासोबत त्याने 'अ डेट इन द गुंज' या वेबसीरिजमध्येही काम केले आहे. तसेच त्याच्या 'मिर्जापूर' आणि 'क्रिमिनल जस्टिस' यांसारख्या वेबसीरिजमधील भूमिकाही गाजल्या आहेत.