मुंबई- जगातील प्रत्येक शेतकरी त्याच्या देशवासीयांच्या उदरभरणाचे काम करीत असतो. इतरत्र त्याला मानसन्मान आणि पैसाअडका मिळत असला तरी आपल्या देशात मात्र बळीराजा उपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत आणि त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्षच केलं जातंय. परंतु या वास्तविक आत्महत्यांच्या विषयावर आधारित चित्रपट आलाय ज्याचं नाव आहे ‘फास’. देश-विदेशातील अग्रगण्य सिनेमहोत्सवांमध्ये 'फास'चं खूप कौतुक करण्यात आलं आहे. 'फास'ची कथा व संवादलेखन माहेश्वरी पाटील चाकूरकर यांनी केलं असून, दिग्दर्शनाच्या जोडीला अविनाश कोलते यांनीच पटकथालेखनाचं कामही केलं आहे. धरतीच्या कुशीतून सोनं पिकवणारा शेतकरी गळ्याला का 'फास' लावून घेतो याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे.
राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता उपेंद्र लिमये या चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे. याखेरीज कमलेश सावंत शेतकऱ्याच्या, तर सयाजी शिंदे डॉक्टरच्या भूमिकेत आहेत. यांना पल्लवी पालकर, गणेश चंदनशिवे, नामदेव पाटील, निलेश बडे, ज्ञानेश उंडगवकर, उमेश राजहंस, शरद काकडे, ईश्वर मोरे, पवन वैद्य, विनय जोशी, देवा पांडे, पूजा तायडे, तेजस्विनी, माधुरी भारती आणि श्रृतिका लोंढे या कलाकारांची साथ लाभली आहे. डिओपी रमणी रंजन दास यांनी या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी केली असून, अपूर्वा मोतीवाले व आशिष म्हात्रे यांनी संकलन केलं आहे. कला दिग्दर्शन संतोष समुद्रे यांचं आहे.
आपण जे करू शकलो नाही ते मुलांना बनवायचं आणि त्यांना खूप मोठं बनवायचं ही स्वप्नं प्रत्येक आई-वडिलांच्या डोळ्यांत तरळत असली तरी शेतकरी मात्र याला अपवाद आहे. आजही जिथे शेतकऱ्यांना दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत आहे, आपल्या मुलांच्या मुलभूत गरजा भागवण्याची चिंता सतावते, तिथं त्यांच्या डोळ्यांत मोठं बनण्याची स्वप्नं कुठून येणार. याच वास्तवतेची जाणीव करून देणारा 'फास' हा मराठी चित्रपट असून त्याचा मन हेलावून टाकणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.