मुंबई -अभिनेत्री तमन्ना भाटिया ही तिच्या पहिल्या वहिल्या वेबसीरिजसाठी सज्ज झाली आहे. तेलुगू, तमिळ आणि हिंदी सिनेसृष्टीत तिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. आता ती एका तमिळ वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणार आहे.
चित्रपटांसोबतच प्रेक्षकांमध्ये वेबसीरिजची लोकप्रियताही पाहायला मिळत आहे. आत्तापर्यंत बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी डिजीटल विश्वात पदार्पण केलं आहे. वेबसीरिजचा कंटेटही प्रेक्षकांना आवडू लागला आहे. त्यामुळे आता तमन्ना देखील वेबसीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा -'घोस्ट स्टोरीज'साठी एकत्र आले आघाडीचे दिग्दर्शक, नव्या वर्षापासून होणार सुरुवात
'द नोव्हेंबर स्टोरी' असे तिच्या वेबसीरिजचे नाव आहे. यामध्ये वडील आणि मुलीच्या नात्याचे विविध पैलू उलगडण्यात येणार आहे. जी. एम. कुमार हे तमन्नाच्या वडिलांची भूमिका साकारणार आहेत.
आपल्या भूमिकेबाबत सांगताना तमन्ना म्हणाली, की 'या वेबसीरिजच्या माध्यमातून माझ्या अभिनयाची आणखी एक बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चित्रपटामध्ये दोन किंवा तीन तास साकारलेली प्रतिमा आणि वेबसीरिजमधून सलग काही भागांमधून पडद्यावर अभिनय करणे, हे आव्हान आहे. पण, हे एक असं माध्यम आहे, ज्याद्वारे मला माझं पात्र साकारण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. तसेच माझ्या भूमिकेलाही वाव मिळेल'.
'प्रेक्षकांना आज अधिकाधिक चांगला कंटेट पाहायला आवडतो. जर, तुमची कथा सत्य असेल, प्रेक्षकांशी मिळतीजुळती असेल, तर तुम्हाला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळे मी अशी संधी मिळवण्यासाठी उत्सुक आहे', असेही ती म्हणाली.
हेही वाचा -सलमानच्या नवीन गाण्यावरून वाद; ट्विटरवर ट्रेंड होतोय 'बॉयकॉट दबंग ३' हॅशटॅग
राम सुब्रहमण्यम हे या वेबसीरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. तर, आनंद विक्रांत ग्रुप या वेबसीरिजची निर्मिती करणार आहेत. हॉटस्टार अॅपवर ही सीरिज पाहायला मिळणार आहे.
या वेबसीरिजशिवाय तमन्नाचा आगामी तेलुगू चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट स्पोर्ट ड्रामा आहे. यामध्ये ती क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहे. तसेच महेश बाबुसोबतही 'सरीलेरू निक्केवरूआ' या चित्रपटात एका गाण्यात झळकणार आहे.