मुंबई - आज शिवजयंती निमित्त तमाम शिवरायांच्या भक्तांसाठी रितेश देशमुख, नागराज मंजुळे आणि अजय-अतुल यांनी एक मोठी घोषणाकेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची 'महागाथा' निर्माण करण्याचा संकल्प त्यांनी आज केलाय. शिवरायांवर एक महाचित्रपट तिघे बनवण्यासाठी सज्ज झालेत.
रितेश देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्विट करून आपल्या या नव्या चित्रपटाची घोषणा केलीय. या व्हिडिओमध्ये एक वही पहिल्यांदा दिसते. यावर, ''रितेश देशमुख, अजय-अतुल आणि नागराज मंजुळे अभिमानाने सादर करीत आहेत..शिवाजी...राजा शिवाजी...छत्रपती शिवाजी ...महागाथा ही अक्षरे उमटतात.''
म्हणजेच पहिला भाग - शिवाजी, दुसरा भाग - राजा शिवाजी, आणि तिसरा भाग - छत्रपती शिवाजी अशा तीन भागांमध्ये छत्रपतींचा इतिहास रुपेरी पडद्यावर या महागाथेतून माडला जाणार आहे.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने या नव्या चित्रपटाची घोषणा झाल्यामुळे चाहत्यांमध्ये एक नवे स्फुरण चढले आहे. रितेशच्या ट्विटरवर शुभेच्छांचा अक्षरशः पाऊस पडला आहे.
लगेचच रितेश फॅन क्लबवर एका चाहत्याने तयार केलेला व्हिडिओ दिसतो. यामध्ये रितेश छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करीत आहेत हे स्पष्ट होते. या चित्रकार चाहत्यांने छत्रपतींच्या भूमिकेत रितेश कसा दिसेल याचे लाईव्ह चित्र काढले आहे.
नागराज मंजुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महागाथेचे दिग्दर्शन करतील. नागराजनेही ट्विट करीत याला दुजोरा दिलाय.
या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल या जोडीवर सोपवण्यात आलंय. त्यामुळे अत्यंत स्फुर्तीदायी कवने, पोवाडे यासह लोकसंगीताची स्फुर्तीदायक मेजवानी संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल यात काही शंका नाही. २०२१ मध्ये हा चित्रपट चाहत्यांसाठी सिनेमागृहात दाखल होईल.