मुंबई - 'मिसाईलमॅन' एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर आधारित प्रेरणादायी कथा आता मोठ्या पडद्यावर बायोपिकच्या रुपात पाहता येणार आहे. ज्येष्ठ अभिनेते परेश रावल या चित्रपटात त्यांची भूमिका साकारणार आहेत. परेश रावल यांनी स्वत: ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
परेश रावल यांनी एपीजे अब्दुल कलाम यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 'एपीजे अब्दुल कलाम खरच एक महान संताप्रमाणेच होते. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो, की मला त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारण्याची संधी मिळत आहे', असे रावल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा -सिनेमागृहात वाजणार 'बँड बाजा', दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी पहिले पोस्टर लॉन्च
अभिषेक अग्रवाल आणि अनिल सुंकरा हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. अभिषेक यांनी माध्यमांशी बोलताना या बायोपिकवर मोहर लावली आहे. तसेच, परेश रावल यांची यामध्ये मुख्य भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या बायोपिकमध्ये एपीजे अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील महत्वपूर्ण घडामोडी दाखवण्यात आल्या आहेत. राज चेंगप्पा ('वेपन ऑफ पिस' पुस्तकाचे लेखक) यांना या चित्रपटाच्या कथेसाठी विचारण्यात आले आहे. कलाम यांच्या आयुष्यातील घडामोडी योग्य पद्धतीने पडद्यावर दाखवण्यासाठी मेहनत घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा -दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची 'ईटीव्ही भारत'ला भेट
हिंदी आणि इंग्रजी भाषेत हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. अद्याप या बायोपिकच्या प्रदर्शनाची तारीख आणि इतर कलाकार यांच्याविषयीची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.