मुंबई -मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग सुरू केला होता. यामध्ये सोनाली कुलकर्णी, अंकुष चौधरी, सई ताम्हणकर, सिद्धार्थ जाधव यांनी हा हॅशटॅग वापरुन ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्वीटनंतर नेटकरी चांगलेच संभ्रमात पडले. एकीकडे राज्यात सत्तास्थापनेचा तिढा चांगलाच रंगला आहे. अशातच मराठी कलाकारांनी केलेले हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यासही सुरुवात केली होती. मात्र, याबाबत आता खुद्द सिद्धार्थ जाधवनेच स्पष्टीकरण दिलं आहे.
सिद्धार्थने #पुन्हानिवडणूक असे ट्विट केल्यानंतर पुन्हा एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले आहे की, 'आमची पोस्ट ही कोणत्याही युती, आघाडी किंवा राजकीय पक्षाचं प्रमोशन किंवा खंडन करण्यासाठी नाही. राजकारण म्हटलं की निवडणूक आलीच. हाच निवडणुकीचा ‘धुरळा’ आपलं आयुष्य कसं बदलतो याचा अनुभव आपण घेतो आहोतच. असंच काहीसं आमच्याही बाबतीत झालंय, म्हणून आपल्याशी ते शेअर केलं. त्यामागची आमची ‘भूमिका’ लवकरच कळेल आणि आशा आहे आपल्याला आवडेलसुद्धा. सर्वांच्या भावनांचा आम्हाला नितांत आदर आहे. कुणाचीही कुठल्याही प्रकारची दिशाभूल करण्याचा आमचा हेतू नाही”, असं सिद्धार्थने स्पष्ट केलं आहे.
पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. समीर विद्वांस यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही.
हेही वाचा -बंदिस्त चौकटीचा पिंजरा तोडून 'गर्ल्स' प्रेक्षकांच्या भेटीला, पाहा ट्रेलर