महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीचे ‘हाकमारी’ करत निर्मितीक्षेत्रात पदार्पण!

सोनाली कुलकर्णीची पहिली निर्मिती, अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठीचा पहिला वेब चित्रपट आणि समीर विध्वंस यांचे दिग्दर्शन असलेला पहिला भयपट असा त्रिवेणी संगम असलेला ‘हाकमारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा एक सस्पेन्स चित्रपट असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. तसेच कलाकारांची नावेही अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

Sonali Kulkarni
सोनाली कुलकर्णी

By

Published : Mar 16, 2021, 7:06 PM IST

मुंबई - हल्ली अनेक कलाकार अभिनयक्षेत्रात नाव कमाविल्यावर चित्रपटक्षेत्रातील इतर प्रांतात प्रवेशतात. महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाचे नाणे खणखणीतपणे वाजविले आहे. आता ती वेगळ्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. सोनाली निर्मितीक्षेत्रात पदार्पण करीत असून तिची पहिली निर्मिती ‘हाकमारी’ असून तो एक वेब चित्रपट आहे व सोनालीने याची निर्मिती प्लॅनेट मराठीच्या अक्षय बर्दापूरकर यांच्यासोबत केली आहे. हा एक सस्पेन्स चित्रपट असून या सिनेमाच्या कथेबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिक माहिती समोर आलेली नाही. तसेच कलाकारांची नावेही अजून गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहेत.

सोनाली कुलकर्णीचे निर्मितीक्षेत्रात पदार्पण
'हाकामारी' हा प्लॅनेट मराठीचाही पहिलाच वेब चित्रपट असणार आह आणि चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विध्वंस करणार आहेत. फिल्मफेअर पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी २०१३ मध्ये ‘टाईम प्लिज’ या धमाकेदार सिनेमाने त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आतापर्यंत डबलसीट, वायझेड, मला काहीच प्रॉब्लेम नाही, आनंदी गोपाळ, धुरळा आदी यशस्वी सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. यातील अनेक चित्रपटांनी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पातळीवर वाहवा मिळवली आहे. लवस्टोरी स्पेशालिस्ट समीर या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एका भयपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. सस्पेन्स चित्रपटांसाठी प्रेक्षक नेहमीच आतुर असतात आणि म्हणूनच ‘हाकमारी’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि चांगला पर्याय असू शकतो. या सिनेमाची कथा 'दिल दिमाग और बत्ती' फेम आणि साहित्य परिषदेचे पुरस्कार प्राप्त लेखक ऋषिकेश गुप्ते यांनी लिहिली असून त्यांनी आतापर्यंत दंशकाल, दैत्यालय, अंधारवारी, कलजुगरी आदी अनेक मोठ्या आणि गाजलेल्या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.फिल्मफेअर पुरस्कार विजेती अभिनेत्री आणि सर्वांची लाडकी ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या अभिनयाने आणि नृत्याने रसिकांना वेड लावत असते. नटरंग, अजिंठा, क्लासमेट्स,मितवा, हंपी, सिंघम रिटर्न, ग्रेट ग्रँड मस्ती अशा अनेक मराठी, हिंदी सिनेमांमधून सोनालीने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांना तिच्या अभिनयाच्या विविध पैलूंचे दर्शन घडवले. या सिनेमाच्या निमित्ताने सोनाली आपला भाऊ अतुल कुलकर्णीसोबत 'द फॅलेरर्स' या बॅनरच्या अंतर्गत निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. प्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर म्हणाले, "'हाकामारी' या चित्रपटाची कथा लोककथा, गूढता, प्रेम आणि भयपट आदी सर्व विषयांना धरून पुढे जाणारी आहे. हा सिनेमा प्लॅनेट मराठीचा पहिला वेब सिनेमा आहे. या सिनेमामुळे आम्ही एका मोठ्या आणि वेगवान जगात शिरणार आहोत, याचा आम्हाला सर्वात जास्त आनंद आहे. 'द फॅलेरर्स', ए थ्री मीडिया अँड इव्हेंट्स आणि समीर विध्वंस असे सर्व मिळून प्रेक्षकांचे नक्कीच या सिनेमातून जोरदार मनोरंजन करू हे नक्की."निर्मितीक्षेत्रात पदार्पण करणारी सोनाली म्हणाली, "रेडिओ, टीव्ही आणि फिल्म प्रॉडक्शनची विद्यार्थिनी असताना मला निर्मिती क्षेत्राने भुरळ घातली. आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये टॅलेंटला वाव आहे. या सिनेमातून आम्ही एक वेगळा पठडीबाहेरील सिनेमा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. समीर विध्वंस सारखा दूरदृष्टी असणारा दिग्दर्शक, प्लॅनेट मराठी आणि अक्षय बर्दापूरकर ही टीम एकत्र येत एक सुंदर कलाकृती रसिकांसाठी घेऊन येणार आहे."सोनाली कुलकर्णीची पहिली निर्मिती, अक्षय बर्दापूरकर यांच्या प्लॅनेट मराठीचा पहिला वेब चित्रपट आणि समीर विध्वंस यांचे दिग्दर्शन असलेला पहिला भयपट असा त्रिवेणी संगम असलेला ‘हाकमारी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details