महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात पुरस्कारासह सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमानेंचा सन्मान!

आपल्या कलात्मक दृष्टीने पडद्यावरील चलतचित्रांना जिवंत करणारा छायाचित्रकार म्हणजे सुरेश देशमाने यांना ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटासाठी ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड हा बहुमान प्राप्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्माननिय नोंद मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्येसुद्धा झाली होती.

सुरेश देशमानेंचा सन्मान!

By

Published : Jun 16, 2021, 8:05 PM IST

प्रत्येक कलाकाराला पुरस्कार, राष्ट्रीय असो वा आंतरराष्ट्रीय, नवी ऊर्जा देतात, मग, ते काम पडद्यावरील असो वा पडद्यामागील. आपल्या कलात्मक दृष्टीने पडद्यावरील चलतचित्रांना जिवंत करणारा छायाचित्रकार म्हणजे सुरेश देशमाने. गाढवाचं लग्न, बेधडक, ६ गुण, सिटीझन, अश्लील उद्योग मित्र मंडळ अशा अनेक चित्रपटांचे सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने सध्या न्यूजमध्ये आहेत कारण त्यांना ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटासाठी ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड हा बहुमान प्राप्त झाला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्माननिय नोंद मॉस्को फिल्म फेस्टिव्हलमध्येसुद्धा झाली होती.

ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात पुरस्कारासह सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमानेंचा सन्मान!

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सन्मान मिळत आहेत. अत्यंत प्रतिष्ठेच्या न्यूयॉर्क येथील ब्रुकलीन चित्रपट महोत्सवाच्या २४ व्या सत्रात या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमाने यांना बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा बहुमान प्राप्त झालेला आहे. मकरंद अनासपुरे दिग्दर्शित व स्वामीगंगा प्रॉडक्शन्स निर्मित ‘काळोखाच्या पारंब्या’ या एकमेव भारतीय चित्रपटाला या महोत्सवात मानांकन मिळाले होते. जगातील ९३ देशातील २५०० चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड ' नॅरेटिव्ह फिचर फिल्म ' या विभागात १३ चित्रपटांची निवड करण्यात आली, त्यात ‘काळोखाच्या पारंब्या’ चा समावेश होता.

‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटासाठी ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात बेस्ट सिनेमॅटोग्राफी अवॉर्ड

भारतीय सिनेसृष्टीत सातत्याने नवनवे प्रयोग करणारा सृजनशील सिनेमॅटोग्राफर म्हणून देशमाने यांची ओळख आहे. ते सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रयोग करत असतात. मराठी मधील पहिला थ्री-डी चित्रपट त्यांनीच चित्रित केला आहे. ‘काळोखाच्या पारंब्या’ ची आंतरराष्ट्रीय स्तरावर यंदा चर्चा आहे. टेक्सास मधील अतिशय मानाच्या ५४ व्या वर्ल्ड फेस्ट ह्युस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये याच चित्रपटाला प्रतिष्ठेचा 'गोल्ड रेमी अवार्ड' या चित्रपटाला मिळाला आहे. याची निर्मिती मनोज पिल्लेवार, मकरंद अनासपुरे, सुरेश देशमाने यांनी केलेली असून संगीत मिलिंद जोशी व संवाद श्रीकांत सराफ - हेमंत पाटील यांचे आहेत. कला दिग्दर्शन प्रशांत कुंभार, रंगभूषा कुंदन दिवेकर, व्हीएफएक्स अरविंद हातनूरकर, सह सिनेमॅटोग्राफी जगदीश देशमाने यांची आहे.

ब्रुकलीन चित्रपट महोत्सवात पुरस्कारासह सिनेमॅटोग्राफर सुरेश देशमानेंचा सन्मान!

सिनेमोटोग्राफीसाठी ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटाला मानांकन मिळाले होते आणि अंतीम फेरीत ८ हॉलिवुड आणि ४ ब्राझीलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले सिनेमॅटोग्राफर स्पर्धेत असताना सुरेश देशमाने यांना तज्ज्ञ ज्युरीनी कौल दिला. विशेषत: मराठी चित्रपट सृष्टीत काम करणारे सुरेश देशमाने यांना बॉलिवुड मध्येही मानाची ओळख आहे. नुकताच त्यांना ‘काळोखाच्या पारंब्या’साठी मॉस्को इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्येदेखील बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार मिळाला आहे. प्रख्यात कथालेखक भारत सासणे यांच्या ‘डफ’ या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारित आहे. वासना, लोभामुळे एखाद्या उमलत्या आयुष्याची कशी वाताहत होत जाते. संयम, संस्कार जीवनात किती महत्त्वाची बाब आहे, हे सूत्र ‘काळोखाच्या पारंब्या’मध्ये अनासपुरे यांनी अतिशय प्रभावीपणे मांडले आहे. त्यात मकरंद यांनी रहिमचाचाची मध्यवर्ती भूमिकाही साकारली आहे. त्यांच्यासोबत वैभव काळे, काजल राऊत या नवोदित कलावंतांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. पुरुषोत्तम चांदेकर, प्रा. डॉ. राजू सोनवणे, प्रेषित रुद्रवार आदींच्या प्रमुख भूमिका आहे.

दिग्दर्शक-अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, “ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हलमध्ये दखलपात्र ठरणे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. देशमाने हे अव्वलदर्जाचे सिनेमॅटोग्राफर आहेत. त्यांनी केलेल्या मेहनतीला अशी दाद मिळालेली पाहून अतिशय आनंद होतो आहे. मराठी कलावंतांनी केलेल्या मेहनतीला दाद मिळते आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मराठी साहित्याची ताकद यातून सिद्ध होते. मराठीतील सशक्त कथा-कादंबर्‍यांचे सिनेमात रूपांतर केले तर जागतिक पातळीवर त्याची नोंद घेतली जाते, हे या निमित्ताने सिद्ध होते आहे.”

पुरस्कारविजेते सुरेश देशमाने व्यक्त झाले, “आंतरराष्ट्रीय स्तरावर सिनेमाचे तंत्र अत्यंत प्रगत असे आहे. त्यांचे बजेटही मोठे असते. अत्यंत तुटपूंज्या साहित्यासह तशा प्रतिकूल स्थितीत काम करताना कल्पकतेने मन लावून काम केले तर या त्रुटींवर मात करता येते, हे या चित्रपटासाठी मिळालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या पुरस्कारांनी सिद्ध केले आहे. माझ्या कामाची अशी जागतिक पातळीवर दखल घेतली जाण्याचा निश्चतच आनंद वाटतो.”

विशेष म्हणजे ‘काळोखाच्या पारंब्या’ या चित्रपटास प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर यांनी मार्गदर्शन केले असून या चित्रपटाचे नामकरणही त्यांनीच केले. पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्येही या चित्रपटाची निवड झाली आहे.

हेही वाचा - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत' ज्येष्ठ अभिनेता चंद्रशेखर कालवश

ABOUT THE AUTHOR

...view details