मुंबई - अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू दुबईच्या हॉटेलमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारीत झाला होता. बाथटबमध्ये बुडाल्यामुळे मृत्यू झाल्याचा अहवाल दुबई पोलिसांनी दिला होता. असे असले तरी केरळचे डीजीपी ऋषिराज सिंह यांनी हा अपघाती मृत्यू नसून मर्डर असल्याचे म्हणत खळबळ उडवून दिली आहे. यामुळे श्रीदेवीचा मृत्यू अपघात की घातपात या विषयावर पुन्हा चर्चा रंगू लागली आहे.
डीजीपी ऋषिराज सिंह यांनी आपल्या कॉलममध्ये असे लिहिले होते, "माझे मित्र आणि दिवंगत फॉरेन्सिक तज्ञ डॉ. उमादातन यांनी खूप मला आधीच श्रीदेवीचा मृत्यू अपघाताने झाला नसल्याचे सांगितले होते. एक उत्सुकता म्हणून त्यांना हा मी प्रश्न विचारला होता. तेव्हा ही गोष्ट त्यांनी मला सांगितली.
"त्यांनी काही विशिष्ट वास्तवदर्शी मुद्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्या दाव्यात केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीही नशेत असले तरीदेखील एक फूट पाण्यात ती व्यक्ती बुडू शकत नाही. जर कोणीतरी त्या व्यक्तीचे दोन्ही पाय पकडून डोके पाण्यात दाबल्याशिवाय ती व्यक्ती बुडू शकत नाही.", असे लिहित केरळचे डीजीपी ऋषिराज सिंह यांनी श्रीदेवीच्या मृत्यूबद्दल प्रश्न चिन्ह निर्माण केले आहेत.