हैदराबाद- दाक्षिणात्य अभिनेत्रीने हिंदी सिनेमाचा पडदा गाजवला त्या होत्या वैजयंती माला. 13 ऑगस्ट 1936 रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वैजयंतीमाला यांनी वयाच्या 13 व्या वर्षी तमिळ चित्रपटातून आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या बॉलिवूडमध्ये कारकिर्दीची सुरुवात 1951 मध्ये रिलीज झालेल्या 'बहार' चित्रपटातून केली. 1954 साली रिलीज झालेला 'नागिन' हा चित्रपट वैजयंतीमाला यांच्या सिने कारकिर्दीतील पहिला सुपरहिट चित्रपट ठरला.
1955 मध्ये रिलीज झालेला 'देवदास' हा चित्रपट वैजयंती मालाच्या सिने कारकिर्दीतील महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये गणला जातो. विमल राय दिग्दर्शित व शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात वैजयंती माला यांनी रुपेरी पडद्यावर चंद्रमुखीचे पात्र साकारले. या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
1958 मध्ये रिलीज झालेला 'साधना' हा चित्रपट वैजयंती मालांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट होता. वैजयंती माला यांना बी.आर. चोप्रा निर्मित दिग्दर्शित 'साधना' चित्रपटासाठी त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
1958 सालीच प्रदर्शित झालेला 'मधुमती' हा चित्रपट वैजयंतीमालाच्या कारकिर्दीतील आणखी एक उल्लेखनीय चित्रपट ठरला. विमल राय निर्मित, हा चित्रपट 'पुनर्जन्म' विषयावर आधारित होता. वैजयंती माला यांनी या चित्रपटात तिहेरी भूमिका करून प्रेक्षकांना रोमांचित केले. या चित्रपटातील त्यांच्या दमदार अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले.