लेखक दिग्दर्शक जय के यांचा हॉररपट ‘एझरा’ हा मल्याळम भाषेतील चित्रपट खूपच गाजला होता. आता ते त्याची हिंदी आवृत्ती घेऊन आले आहेत ज्यात इम्रान हाश्मी प्रमुख भूमिकेत दिसेल. चित्रपटाचे नाव ‘डिबुक : द कर्स इज रियल’ असून नावातूनच हॉरर झळकताना दिसतोय. नुकतेच एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले. अमेझॉन प्राइम व्हिडिओने बहुप्रतीक्षित रहस्यमय- थरारपट 'डिबुक – द कर्स इज रियल' या सिनेमाचे गुंतवून ठेवणारे ट्रेलर प्रदर्शित केले आणि नेटिझन्सनी त्याची स्तुती केली आहे.
टी- सीरीज आणि पॅनोरमा स्टुडिओज यांची एकत्रित निर्मिती असलेल्या आगामी अमेझॉन ओरिजनल सिनेमात इम्रान हाश्मी त्याच्या लोकप्रिय जॉनरच्या चित्रपटात दिसणार असून सोबत निकिता दत्ता व मानव कौल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. मॉरिशसच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या सिनेमात एका शापित बेटावर घडणारे भयंकर प्रसंग पाहायला मिळतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये एक विवाहित महिला प्राचीन ज्यूईश बॉक्स समजून डिबुक बॉक्स घरी घेऊन आल्यानंतर उद्भवणारे भयावह आणि विचित्र प्रसंग रंगविण्यात आले आहेत.
"हा सिनेमा अतिशय विचारपूर्वक, काही घाबरवणारे प्रसंग समाविष्ट करत उत्तम कथानकासह तयार करण्यात आला आहे. डिबुक हा माझा पहिला डिजिटल सिनेमा आहे आणि माझ्या आवडत्या प्रकारच्या भूमिकेसह स्ट्रीमिंग पार्टनर म्हणून अमेझॉन प्राइम व्हिडिओवर या प्रवासाची सुरुवात करत असल्याचा आनंद आहे", असे इम्रान हाश्मी म्हणला. तो पुढे म्हणाला की, "मला लहानपणापासूनच हॉरर चित्रपट आवडतात आणि मी बरेच हॉररपट केलेत. हा चित्रपट त्या सर्वांपेक्षा भिन्न आहे म्हणूनच तो सर्वांनी पाहावा असे मी आवाहन करेन.”