मुंबई- अभिनेत्री तापसी पन्नूची मुख्य भूमिका असलेल्या 'रश्मी रॉकेट' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्याची घोषणा निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे. गुजरातमधील कच्छ भागाच्या पार्श्वभूमीवर एका महिला अॅथलेटची ही गोष्ट मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश खुराणा करीत आहेत.
तापसी पन्नू हिची भूमिका असलेल्या 'रश्मी रॉकेट' चित्रपटाची कथा एका गावातील मुलीची आहे. वेगात धावण्यासाठी ईश्वराचे तिला वरदान मिळाले आहे. या अतुलनीय क्षमतेमुळे गावकरी तिला रॉकेटच्या नावाने ओळखतात. जेव्हा तिला व्यावसायिकदृष्ट्या आपली प्रतिभा दाखवण्याची संधी मिळते, तेव्हा ती ही संधी तिच्या हातातून जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत धावण्यात अनेक अडथळे आहेत, याची तिला जाणीव होते. अॅथलेटिक स्पर्धेसारखी दिसणारी ही शर्यत, सन्मान, आदर आणि अगदी स्वतःच्या ओळखीसाठी वैयक्तिक लढाईत रुपांतरित होते.
आरएसव्हीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही घोषणा केली. “आम्हाला लवकरच ट्रॅकवर फक्त एकच नाव ऐकायला मिळणार आहे! रश्मी रॉकेट, शूटिंगला आजपासून सुरूवात होत आहे,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.
चित्रपटाचे शूट यापूर्वी या वर्षाच्या प्रारंभी सुरू झाले होते, परंतु कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे विलंब झाला.