मुंबई - हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेता आर माधवन याचा आज वाढदिवस आहे. 'रहना है तेरे दिल मे'मधील 'मॅडी' ते थ्री-इडियट्स मधील 'फरहान'पर्यंत त्याच्या असंख्य भूमिका लोकप्रिय आहेत. आर माधवनचे कोल्हापूरात शिक्षण झालंय. राजाराम महाविद्यालयात तो डॅशींग पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या रुममेट होता. ‘मन में है विश्वास’ या पुस्तकात नांगरे पाटलांनी माधवनसोबत मैत्रीचे अनेक किस्से सांगितले आहेत. मात्र आज आम्ही आपल्याला माधवनचा एक अनोखा किस्सा सांगणार आहोत.
आर. माधवन जसा सिनेसृष्टी नाव गाजवतोय तसाच स्वप्निल राजशेखर हा मराठी सिनेमा आणि टीव्ही मालिका गाजवतोय. दोघेही कलाकार...दोघांचाही वाढदिवस एक दिवस आड करुन...म्हणजे, ३१ मे रोजी स्वप्निल राजशेखर यांचा वाढदिवस असतो आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जून रोजी आर माधवनचा वाढदिवस साजरा होतो. पण दोघांच्यामध्ये आणखी एक साम्य आहे ते म्हणजे कोल्हापूरात असताना दोघेही एनसीसीमध्ये होते. या दरम्यान माधवनला चांगलाच धडा शिकवायचा प्रण स्वप्निल राजशेखरने केला होता. त्याचा हा धमाल किस्सा माधवनच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वप्निल राजशेखरने सोशल मीडियावर लिहिला होता, तो पुढील प्रमाणे...
मी एनसीसी मधे होतो.. दोन आठवडे!!
आणि त्याकाळी संजय दत्त छाप मागचे केस लांब ठेवण्याची फॅशन होती..
माझेही होते...
ते सतत सेट करुन नीटस ठेवत फिरायचो...
प्राणांतीक जपायचो..
एनसीसी आणि लांब केस म्हणजे ‘संघ-पुरोगामी’ परस्परसंबंध...
मला दोन्ही एकावेळी हवं होतं...
मी शक्कल काढली
लांब केस पीनअप करुन एनसीसीच्या टोपीमधे टाकायचे..
सुगावा लागणार नाही अशा पध्दतीने कॅपने डोकं कवर करायचे..
एका रविवारची परेड मारुन नेली यावर..
त्याच्या फुशारक्याही मारल्या दोस्तात..
बरं मी मुळचा गलथान, आळशी, पसरट, अस्त्याव्यस्त, बेशिस्त स्वभावाचा..
शिस्त, काटेकोरपणा हे माझ्या नसात नाहीच...
एनसीसी म्हणजे कडक शिस्तीचा मामला...
मी का त्या वाटेला गेलो नकळे..
युनिफॉर्मचं आकर्षण असावं, बाकी काही नाही...
तर मुद्दा..
पुढच्या रविवारी राजाराम कॉलेजच्या ग्राऊंडवर परेडसाठी गेलो.. कॅपमधे केस लपवुन... काळजीने रांगेत उभा होतो...
एक सिनीयर कॅडेट कडक आवाजात परेड घेत होता...
आणि अचानक मधेच माझ्याजवळ आला...
मला म्हणाला ‘बाहर आव’
मी साळसुदपणे प्रश्नार्थक पाहिलं..
तो मराठीत ओरडला ‘बाहेर ये’
मी आलो...
त्याने माझी टोपी ओढली..
हिसक्याने पीना सुटल्या, लांब केस लोंबु लागले..
सगळे कॅडेटस.. जवळपास दिडदोनशे माझ्यावर हसायला लागले...
मी गोरामोरा, अपमानीत...
तो ईंग्रजीत काहीतरी अर्वाच्य बोलला...
मला अर्वाच्च पेक्षा त्याचं ईंग्रजी लागलं... (मराठी मिडीयम!!!!!)
मग मला तो त्याच्या सिनीयर्स समोर घेऊन गेला..
त्यानी माझ्याकडे अवाक लुक दिला आणि मला बेडुकउड्या मारायला सांगितलं..
झीरो कट मारण्याची तंबी दिली..
मी मान खाली घालुन ‘येस सर’ म्हणालो...
त्या सिनीयर कॅडेटने मला सगळ्यांसमोर बेडुक उड्या मारायला लावल्या...
माझ्या घशाखाली अपमान उतरेना.. मी त्याला पाहुन ठेवला...
तिथुन निघालो ते बदला घ्यायचं प्लॅनींग करुनच...
एनसीसी तर तत्क्षणी मनातुन फेकुन दिली होती मी...
आता फक्त बदला..
राजाराम पासुन सायकल वरुन पेठेत येईपर्यंत लालबुंद विचार रंगला...
तो सिनीयर कॅडेट उंचीला माझ्याएवढाच होता.. पण वयाने, बांध्याने मोठा तगडा होता...
मी किडम्या होतो... सींगल पसली..
‘वन टु वन’ परवडणारं नव्हतं...
‘झुंड से शिकार’ हाच पर्याय.. फिल्मी क्रेझ होती गॅंगफाईटची.. ‘बेसावध गाठुन टोले टाकायचे..
बेडुक उड्या काढायला लावायच्या रस्त्यावर’ वगैरे रंगलं मनात...
गॅंगला सांगीतलं.. सगळे हौशेने तयार.. माझ्याएवढेच अडानी... कामं नाहीत...
पुढच्या रविवार पर्यंत धीर धरवेना म्हणुन लगेच गाठायचं ठरलं... मोहिमेचा मीच म्होरक्या, मग मी चौकशी करायला सुरुवात केली...
‘कोणी बाहेरचा पोरगा आहे’ एवढं कनफर्म झालं..
मग तर दांडगा उत्साह आला.. “बाहेरचा पोरगा असुन कोल्लापुरात युन आमाला तंबी ? अपमान ? शिस्त बीस्त ? एनसीसी असली म्हनुन काय झालं ?! हेज्यायला...“
पुढं दोन तीन दिवस त्याचा माग काढला पण फार काही लागेचना... तीन चार दिवस आणखी गेले...