मुंबई- पंतप्रधानांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या चित्रपटाला स्थगिती दिली. अशातच आता चित्रपटाच्या टीमला आणखी एक धक्का बसला आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलरही यूट्यूबवरून गायब झाला आहे.
'मोदी' बायोपिकला आणखी एक धक्का, ट्रेलर यूट्यूबवरून गायब
यूट्यूब किंवा अन्य कोणत्याही साईटवर या बायोपिकचे नाव सर्च केल्यास हा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचा मजकूर दिसत आहे. चित्रपटाच्या मार्गात आतापर्यंत अनेक अडथळे आले.
यूट्यूब किंवा अन्य कोणत्याही साईटवर या बायोपिकचे नाव सर्च केल्यास हा व्हिडिओ उपलब्ध नसल्याचा मजकूर दिसत आहे. चित्रपटाच्या मार्गात आतापर्यंत अनेक अडथळे आले. सुरुवातीला हा चित्रपट २९ मार्चला प्रदर्शित होणार होता, मात्र सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर चित्रपटाविरोधात दाखल याचिकेमुळे ही तारीख ११ एप्रिलवर ढकलण्यात आली. मात्र, निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास हा आचारसंहितेचा भंग असेल, असे म्हणत निवडणूक आयोगाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली.
आता हा ट्रेलर यूट्यबूवरून हटवण्यामागे नेमके काय कारण आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय नरेंद्र मोदींची भूमिका साकारत आहे. आता चित्रपटाच्या मार्गातील अडथळे कधी दूर होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.