मुंबई- यंदाचं वर्ष राजकाराणावर आधारित चित्रपटांसाठीच ओळखलं जाईल, असं म्हणणं कदाचित वावगं ठरणार नाही. द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिसिटर, ठाकरे, एनटीआर आणि पीएम नरेंद्र मोदींपाठोपाठ आता लाल बहादुर शास्त्रींवर आधारित चित्रपटही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'द ताशकंद फाइल्स' लाल बहादुर शास्त्रींच्या मृत्यूचं उकलणार गूढ?
भारतीय राजकारणात आजही शास्त्री यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांना घेऊन 'द ताशकंद फाइल्स' चित्रपटाची निर्मिती केली गेली असल्याचे म्हटले जातं
हा एक थ्रिलर चित्रपट असणार आहे, जो शास्त्री यांच्या मृत्यूवर आधारित असणार आहे. भारतीय राजकारणात आजही शास्त्री यांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न आहेत. याच प्रश्नांना घेऊन 'द ताशकंद फाइल्स' चित्रपटाची निर्मिती केली गेली असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, नसीरूद्दीन शाह, श्वेता बसु प्रसाद, पंकज त्रिपाठी, विनय त्रिपाठीसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.
नुकतंच चित्रपटातील कलाकारांचे लूक आणि त्यांच्या भूमिकेविषयी माहिती देणारे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहेत. मिथुन चक्रवर्ती यात श्याम सुंदर त्रिपाठी यांची भूमिका साकारणार आहेत. श्वेता बासु प्रसाद ही रागिनी फुले नावाच्या महिला पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. तर पंकज त्रिपाठी शास्त्रज्ञ गंगाराम झा यांच्या भूमिकेत झळकणार आहे. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाचा ट्रेलर २५ मार्चला प्रदर्शित होणार आहे. तर १२ एप्रिलला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.