मुंबई- बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने एक फोटो शेअर केला असून 'तुफान' चित्रपटाच्या दरम्यान त्याच्या शरीरात झालेले बदल त्याने सांगितले आहेत. या भूमिकेसाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. यातील एका लूकसाठी त्याने 6 आठवड्यात 15 किलो वजन वाढवल्याचे त्याने सांगितले.
69 वजनाचा फरहान बनला 85 किलोचा
फरहान अख्तरने इन्स्टाग्रामवर तीन फोटोंचा एक कोलाज शेअर केला आहे. यात 69 किलो इतके असलेले वजन 85 किलो झाल्याचे दुसऱ्या फोटोत दिसत आहे. नंतर तिसऱ्या फोटोत त्याने पुन्हा वजन 76 किलो इतके घटवल्याचे दिसत आहे. 'तुफान' चित्रपटातील अजीझ अली या व्यक्तीरेखेसाठी स्वतःत झालेल्या बदलांचा प्रवास यात पाहायला मिळत आहे. फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, " 'तुफान'मधील अजीझच्या भूमिकेसाठी शरीरात झालेले बदल. अविरत मेहनतीचे 18 महिने, प्रत्येक मसल आणि वाढलेला आणि घटवलेला प्रत्येक पाऊंड, परंतु गाळलेला प्रत्येक थेंब कामी आला."
फरहानच्या बॉडीचे बॉलिवूडकरांनी केले कौतुक
फरहानने शरीरात केलेल्या या बदलाचे बॉलिवूडमधील अनेकांनी कौतुक केले आहे. जिंदगी ना मिले दोबारामधील त्याचा सहकलाकार ह्रतिक रोशनने त्याला प्रतिक्रिया देऊन आश्चर्य व्यक्त केलंय. तर गली बॉय फेम सिध्दांत चतुर्वेदीनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
'तुफान'ची निर्मिती
‘तूफान’ ची निर्मिती रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरच्या एक्सेल एंटरटेनमेंट आणि ROMP पिक्चर्सनी केली आहे. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ROMP पिक्चर्सच्या संयुक्त विद्यमाने अॅमेझॉन प्राइम व्हिडिओद्वारे "तूफान" सादर केला गेला आहे. ‘तूफान’ या चित्रपटात फरहान अख्तर, मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक शाह आणि हुसेन दलाल यांच्या मुख्य भूमिका आहेत आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ती दिग्दर्शित केला आहे.
अज्जू भाई ते बॉक्स अजीझ अली प्रवासाची कथा 'तुफान'
'भाग मिल्खा भाग' या सिनेमातील यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा या दमदार जोडीने ‘तूफान’ मधून एक दमदार पंच पेश केलाय. ही प्रेरणादायी कथा आहे मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन तयार होण्याचा प्रवास यात चितारला आहे. तुफान मध्ये बॉक्सिंग एक खेळ म्हणून जिवंत होतोच. शिवाय, आपल्या स्वप्नांचा वेध घेताना आयुष्यात येणाऱ्या चढ-उतारांतून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या एका सामान्य माणसाचा जीवन प्रवासही यात रेखाटला आहे. ही कथा आहे जिद्दीची, तगून राहण्याच्या इच्छेची, चिकाटीची आणि यश मिळवण्याची महत्त्वाकांक्षा यांची ही कथा आहे.
हेही वाचा - समाज माध्यमांवर ‘तूफान’ ला मिळतोय वादळी पाठिंबा, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश झालेत खूष!