दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती चिंताजनक, हैदराबादमधील रुग्णालयात उपचार
दिग्दर्शन करण्यासोबत गेले काही वर्षे त्यांनी आपला मोर्चा अभिनयाकडेदेखील वळवला होता. 'रॉकी हँडसम', 'डॅडी', 'भावेश जोशी' अशा काही बॉलिवूड सिनेमामध्ये त्यांनी भूमिका देखील साकारल्या आहेत.
मुंबई -'डोंबिवली फास्ट', 'दृश्यम', 'मदारी', 'मुंबई मेरी जान', 'फोर्स', 'रॉकी हँडसम' यासारख्या सिनेमाचा दिग्दर्शक निशिकांत कामतची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात आयसीयू विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.
निशिकांत यांच्या जवळच्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून निशिकांतला लिव्हर सीरियॉसिसचा त्रास होता. हाच त्रास अचानक वाढल्याने त्याला तातडीचे उपचार करण्यासाठी हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू असले तरीही त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली आहे.
गेल्याच आठवड्यात त्यांनी दिग्दर्शित केलेल्या दृश्यम या सिनेमाला 5 वर्ष पूर्ण झाली. याबाबत खास पोस्ट टाकून अभिनेत्री तब्बू हिने ही आठवण आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केली होती. गेले काही दिवस ते त्यांच्या आगामी रेहबदर या सिनेमाचं काम करण्यात व्यग्र होते. 2022 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार होता. मात्र, त्यापूर्वीच अचानक त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले आहे.
दिग्दर्शन करण्यासोबत गेले काही वर्षे त्यांनी आपला मोर्चा अभिनयाकडे देखील वळवला होता. 'रॉकी हँडसम', 'डॅडी', 'भावेश जोशी' आशा काही बॉलिवूड सिनेमामध्ये त्यांनी भूमिका देखील साकारल्या आहेत.