नवी दिल्ली - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देत, अनुपम खेर यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते नसीरुद्दीन शाहांना म्हणाले, की तुम्हाला मी गांभीर्याने घेत नाही. मीच काय, तर आतापर्यंत तुम्ही ज्या-ज्या लोकांवर टीका केली होती त्यांपैकी कोणीच तुम्हाला गांभीर्याने घेतले नाही.
"नसीरुद्दीन शाहांना माझा नमस्कार. ते माझ्याहून वयानेही आणि अनुभवानेही मोठे आहेत. त्यांच्या कलेचा मी नेहमीच आदर करत आलो आहे. मात्र कधीकधी काही गोष्टींचे उत्तर हे द्यावेच लागते. हे आहे माझे उत्तर.." अशा कॅप्शनखाली अनुपम खेर यांनी आपला व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यामध्ये ते म्हणतात, की "माझे 'कौतुक' करताना माझ्याबाबत तुम्ही जे काही बोललात ते सर्व मी ऐकले. मी जोकर आहे, ते माझ्या रक्तात आहे, वगैरे वगैरे. या सर्वासाठी धन्यवाद, मात्र मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमचे म्हणणे आजिबात गांभीर्याने घेत नाही. मला या गोष्टीचे मात्र वाईट वाटते, की यशाचे शिखर गाठूनही, तुम्ही तुमचे आयुष्य कुढत घालवले आहे.
जर तुम्ही दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, शाहरूख खान, विराट कोहली अशा लोकांवर टीका करून आता माझ्यावरही टीका करत असाल, तर नक्कीच मी एका चांगल्या समूहात आहे. या लोकांपैकी कोणीही तुमचे म्हणणे गांभीर्याने घेतले नाही. कारण आम्हाला सर्वांना माहीत आहे की, वर्षानुवर्षे तुम्ही ज्या पदार्थांचे सेवन करत आले आहात, त्यामुळे तुम्हाला काय बरोबर आहे, आणि काय चूक आहे यामधील फरकच लक्षात येत नाही.
माझ्यावर टीका करून जर एक-दोन दिवसांसाठी तुम्ही प्रसिद्धीच्या झोतात येत असाल तर, ही माझ्याकडून तुम्हाला भेट समजा. देव तुम्हाला सुखी ठेवो. आपला शुभचिंतक, अनुपम. माझ्या रक्तामध्ये काय आहे तुम्हाला माहीत नसेल. माझ्या रक्तामध्ये 'हिंदुस्तान' आहे, हे केवळ लक्षात असूद्या, जयहिंद." अशा आशयाचा संदेश अनुपम खेर यांनी नसीरुद्दीन शाहांना दिला आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांचे नसीरुद्दीन शाह यांनी समर्थन केले होते. तसेच, चित्रपटसृष्टीमधील प्रस्थापित लोक याबाबत काही बोलत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली होती. यावेळी बोलताना त्यांनी सोशल मीडियामध्ये अॅक्टिव्ह असणाऱ्या सेलिब्रिटींनी अशा वेळी एक ठाम मत तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. ते पुढे म्हणाले होते, की अनुपम खेर यांच्यासारखे लोक तिथे बरेच 'अॅक्टिव' असतात. मात्र, खेर यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, ते एक जोकर आहेत. त्यांच्यासोबत काम केलेल्या सर्व सहकाऱ्यांना विचारून तुम्ही त्यांच्या स्वभावाची माहिती करून घेऊ शकता. मात्र, ते त्यांच्या रक्तात आहे, त्याबद्दल कोणी काही करू शकत नाही.
हेही वाचा : माझ्याकडे जन्माचा दाखला नाही, ..म्हणजे मी भारतीय नाही का?