मुंबई- अनन्या पांडे ने ‘स्टुडन्ट ऑफ दा ईयर २’ मधून चित्रपटसृष्टीत पाऊल टाकलं आणि तिने नंतर ‘पती पत्नी और वो’ मध्ये अभिनय केला. ‘पँडेमिक मुळे नवीन कलाकारांची उमेदीची दोनेक वर्षे फुकट गेली’ असे तिचे मत आहे. अनन्या ने आता 'गहराइयाँ' मध्ये काम केले असून तो प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपट एका बोल्ड विषयावर आहे आणि तिची भूमिकासुद्धा बोल्ड आहे का असे विचारल्यावर ती म्हणाली, “मी बोल्ड हा शब्द वापरणार नाही. पण हो, ही भूमिका कठीण आहे हे सुरुवातीलाच समजले होते. त्यामुळे ती कशी काय करायची याचे प्रश्नचिन्ह होते त्यामुळे थोडीफार नर्व्हस जरूर होते. माझा को-स्टार सिद्धांत सुद्धा थोडा कन्फयुस्ड होता, माझ्याप्रमाणेच. परंतु शकुन बात्रा बरोबर काम करण्याची इच्छा होती आणि आलेली संधी दवडायची नव्हती म्हणून 'गहराइयाँ' चा भाग झाले. अर्थातच शकुन आणि दीपिका, सिद्धांत, धैर्य यांचा काम करताना पाठिंबा मिळत गेला आणि त्यामुळे मी हा रोल दिग्दर्शकाला हवा तसा साकारू शकले.”
दिग्दर्शक शकुन बात्रा बरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल सांगताना अनन्या म्हणाली, “शकुन माझ्या ‘विश-लिस्ट’ मध्ये होता कारण त्याचे ‘एक मैं और एक तू’ तसेच ‘कपूर अँड सन्स’ मला खूप आवडले होते. तो वास्तविक जीवनातील कथा आणि पात्र निवडतो आणि त्यांना प्रामाणिकपणे पेश करतो. त्याच्या चित्रपटांत कुठेही चकचकीतपणा नसतो. तसेच चित्रपटाचा शेवट सुखद असावा हा त्याचा अट्टाहास नसतो. तसेच त्या चित्रपटातील संवादही नेहमीच्या संभाषणातील असतात. त्याने मला आणि प्रत्येक कलाकाराला सूट दिली होती आपापली भूमिका हव्या त्या पद्धतीने मांडण्याची. अर्थात त्याची मदत होतीच सीन्स करताना. त्याने मला एक गोष्ट सांगितली होती, ‘भूमिकेबद्दल जरुरीपेक्षा जास्त विचार करू नकोस’. मी आयुष्यात प्रत्येक गोष्टीवर ‘ओव्हर-थिंक’ करते त्यामुळे कधीकधी मेंटल ब्लॉक येण्याचा संभव असतो. मी फिल्मी वातावरणात वाढल्यामुळे फिल्मी वागते त्यामुळे शकुन ने मला ताकीद दिली होती की कुठलाही सीन करताना फिल्मी फॅशन ने करू नकोस. त्याने सांगितले की उस्फुर्तपणे भावना येऊ देत, आपलं स्वत्व भूमिकेत ओत. खरोखर मी त्याची ऋणी आहे माझ्याकडून चांगलं काम करून घेतल्याबद्दल.”
हेही वाचा - 'गहराइयाँ' प्रमोशनमध्ये तुम्हाला कोण जास्त आवडलं, दीपिका की अनन्या?