मुंबई- बॉलिवूडमधील आघाडीचा गायक मिका सिंग याने 8 ऑगस्टला पाकिस्तानातील एका हाय प्रोफाईल व्यक्तीच्या कार्यक्रमात परफॉर्म केल्यामुळे ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने त्याच्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मिकाने देशप्रेमापेक्षा पैशाला अधिक महत्त्व दिल्याने त्याच्यावर हा बहिष्कार टाकण्यात आल्याचं असोसिएशनने म्हटलं होतं. अशात आता या असोसिएशनच्या कामगारांनी मिकाच्या घराबाहेर त्याच्या या कृतीचा निषेध करत निदर्शने केली आहे.
काही लोकांनी त्याच्या घराबाहेर पोस्टरबाजी करत त्यावर भारत माता की जय, देशाहून मोठा पैसा नसतो, मिका पाकिस्तानात परत जा, पाकचा मिका, मिकाचा पाक...अशा प्रकारचा मजकुर त्यावर लिहिला आहे. एका निदर्शकानं या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, देशानं त्याला दिलेलं प्रेम पुरेस नव्हतं का? तर एकानं म्हटलं, ८ ऑगस्टला मिकानं कराचीमध्ये परफॉर्मन्स केला. याठिकाणी त्याला इतर कोणी नाही, तर परवेज मुशर्रफ यांनी आमंत्रित केलं होतं. मुशर्रफमुळे कारगिल युद्ध झालं आणि ज्यात अनेक जवानांना वीरमरण आलं.