मुंबई - बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याला आज(सोमवार) रात्री पुढील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या आठवड्यात फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्यानंतर आता मुंबईत त्याच्यावर किमोथेरपीचे उपचार सुरू होणार असल्याची चर्चा सूरु झाली आहे. यावेळी घरातून रुग्णालयात निघताना संजयने 'मेरे लिये दुवा करना', अशी विनवणी माध्यम प्रतिनिधीकडे केली.
अभिनेता संजय दत्त कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल, केमोथेरपी सुरु होणार असल्याची चर्चा
कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात सर्वोत्तम उपचार उपलब्ध असल्याने त्याने याच रुग्णालयात स्वतःवर केमोथेरपी सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे.
गेल्या आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे आधी त्याच्यावर कोविड चाचणी करण्यात आली. मात्र, ती निगेटिव्ह आल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याने अचानक रुग्णालयातून घरी जायचा निर्णय घेतला. अवघ्या दोन दिवसात त्याने आपण कामातून ब्रेक घेणार असल्याचे जाहीर केले त्यामुळे त्याला नक्की झालंय काय, असा प्रश्न सगळ्यांना पडला अखेर त्याला फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं समजलं.
गेल्या शनिवारी आणि रविवारी संजय दत्तने बहीण प्रिया दत्त सोबत पुन्हा लीलावती रुग्णालयात जाऊन डॉ. जलील पारकर याची भेट घेऊन कर्करोगावरील उपचारांची पुढील दिशा निश्चित केली. त्यानुसार कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात सर्वोत्तम उपचार उपलब्ध असल्याने त्याने याच रुग्णालयात स्वतःवर किमोथेरपी सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजत आहे.
संजय दत्त याला स्टेज 4 चा कर्करोग असल्याने त्याच्यावर लवकरात लवकर उपचार होणे गरजेचे आहे. दुसरीकडे त्याच्यावर बॉलिवूडचे 735 कोटी रुपये पणाला लागले आहेत. याक्षणी संजूने 6 चित्रपट साईन केले असून त्यातील काही सिनेमाचं शुटींग जवळपास 60 टक्क्यापर्यंत पूर्ण केलं आहे. यात यशराज फिल्म्सचा महत्वाकांक्षी 'पृथ्वीराज' या सिनेमाचा समावेश आहे. त्यामुळे तो लवकरात लवकर बरा होऊन परतावा, अशी इच्छा त्याचे चाहते व्यक्त करत आहेत.