चंद्रपूर- बॉलिवूड अभिनेता आमिर खान नुकतंच बल्लारपूर येथे मिशन शक्ती या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी आला होता. यावेळी त्याने याठिकाणी उपस्थिती विद्यार्थ्यांना मूलमंत्र दिला. खेळ तुम्हाला सर्वार्थाने आयुष्य कसं जगायचं हे शिकवतो. खेळच संपूर्ण जग बदलू शकतो, असं आमिर यावेळी म्हणाला.
यावेळी त्याने आपल्या शालेय जीवनाविषयीही सांगितले. आमिर म्हणाला, माझ्या शालेय जीवनात आम्हाला खूप विषय होते. मात्र, अभ्यासात मला काही विशेष गोडी नव्हती. माझं लक्ष हे नेहमी खेळाकडे असायचं. अनेक खेळांमध्ये मी पारंगत होतो. आज जेव्हा मी मागे वळून बघतो तर मला इतिहास, भूगोल, गणित या अभ्यासाच्या विषयाबद्दल काहीही आठवत नाही. मात्र जे खेळ मी खेळलो त्याची प्रेरणा आजही माझ्यात आहे.
दरम्यान, मिशन शौर्य या मोहिमेंतर्गत मागील वर्षी जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट हे शिखर सर केले होते. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून पालकमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मिशन शक्ती ही मोहीम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून 2024 ऑलिम्पिक हे लक्ष्य ठेवून यामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी सक्षम असे खेळाडू तयार करण्याच्या दृष्टीने मिशन शौर्य शक्ती ही मोहीम सुरू करण्यात आली.
आमिरचा चंद्रपूरातील विद्यार्थ्यांना मूलमंत्र या कार्यक्रमादरम्यान राज्याचे अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनोगत व्यक्त केले. हा जिल्हा खऱ्या अर्थाने हिऱ्याची खान असून भविष्यात चंद्रपूर आपली विशेष ओळख निर्माण करणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. यानंतर आमिर खानने आपण पहिल्यांदाच चंद्रपूर आणि बल्लारपुरात आलो असून सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंच भारावून गेलो असल्याचे म्हटले.