नवी दिल्ली : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी ट्विटरच्या लाखो कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याने कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. मात्र दुसरीकडे कर्मचारी कपातीचा ट्विटरलाही फटका बसल्याचे दिसून येत आहे. ट्विटरचा अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) हाताळणारा एकच अभियंता असल्याने ट्विटरची लिंक न उघडण्यापासून ते फोटो अपलोड होणे गंडल्याने लाखो यूजरला त्याचा फटका बसला आहे.
फोटो लोड होणे गंडले, लिंकही ओपन होईना :ट्विटरवर फोटो लोड होणे गंडल्याने त्याचा लाखो यूजरला फटका बसला आहे. त्यासह ट्विटरची लिंकही ओपन न झाल्यामुळे अनेक यूजर्सनी ट्विटरकडे तक्रार नोंदवली आहे. यूजर्सनी लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या सध्याच्या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस ( API ) मध्ये या एंडपॉईंटमध्ये प्रवेश समाविष्ट नसल्याचा मॅसेज ट्विटरवर येत आहे. त्यामुळे यूजर्सची प्रचंड डोकेदुखी झाली आहे. ट्विटरवर फोटोही अपलोड होत नसल्यामुळे यूजर्सनी आपल्या तक्रारी नोंदवल्या आहेत. काही यूजर्सला तर ट्विट डेकमध्ये लॉग इन होत नसल्याच्या तक्रारी नोंदवत आहेत. सुमारे 85 टक्के वापरकर्त्यांना ट्विटरच्या वेब आवृत्तीमध्ये समस्या येत असल्याची तक्रार केली आहे. तर 13 टक्के यूजर्सला मोबाइल प्लॅटफॉर्ममध्येही समस्या येत आहेत.
ट्विटरने दिली काही भाग काम करत नसल्याची माहिती : ट्विटरवर यूजर्सच्या अनेक तक्रारीचा ओघ आल्याने ट्विटर कंपनीने ट्विटरचे काही भाग सध्या अपेक्षेप्रमाणे काम करत नसल्याचे ट्विट केले आहे. आम्ही काही अंतर्गत बदल केला आहे. त्यामुळे काही अनपेक्षित परिणाम झाले आहेत असेही ट्विटरने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. प्रश्नातील बदल हा ट्विटरवरील एपीआयवर विनामूल्य प्रवेश बंद करण्याच्या प्रकल्पाचा एक भाग होता. ते यापुढे एपीआयमध्ये विनामूल्य प्रवेश देणार नसल्याचे ट्विटरने मागिल महिन्यात स्पष्ट केले होते. याबाबत द व्हर्जने सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार ट्विटरने थर्ड पार्टी अस्तित्व संपुष्टात आणले आहे. त्यामुळे कंपनीच्या कामावर गंभीर परिणाम झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
एलन मस्कने मंगळवारी ट्विट करुन दिली माहिती : ट्विटरचे मालक एलन मस्क यांनी मंगळवारी ट्विट करत ट्विटरच्या एपीआयमध्ये बदल केल्याने त्याचा ट्विटरच्या कामावर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे स्पष्ट केले आहे. यावर्षी किमान सहा मोठे आऊटेज झाल्याचेही एलन मस्क यांनी यावेळी नमूद केले आहे. ट्विटरवर मोठ्या प्रमाणात तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर एलन मस्क यांनी हे ट्विट केले आहे.
हेही वाचा - ChatGPT Failed In UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत चॅट जीपीटीचा उडाला फज्जा