महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / opinion

भारत-मालदीव दरम्यान वाहतुकीसाठी विशिष्ट ‘एअर बबल’ची संभाव्यता - भारतीय दूत

संपूर्ण जगभर कोविड-१९ विषाणूची लस शोधण्यासाठी धडपड सुरू आहे, तर काही देश कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. परंतु, जागतिक पर्यटन क्षेत्रावरचे मंदीचे सावट अद्यापही कायम आहे. शिवाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासाचा खर्चही वाढण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असताना देशांतर्गत पर्यटन मात्र सुरू झाले आहे. मालदीवसारख्या काही देशांनी चालू महिन्यापासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आपल्या देशाची दारं खुली केली आहेत.

By

Published : Jul 31, 2020, 5:21 PM IST

India-Maldives Air Bubble Likely For Limited Flight Operations: Indian Envoy y
भारत-मालदीव दरम्यान वाहतूकीसाठी विशिष्ट ‘एअर बबल’ची संभाव्यता - भारतीय दूत

हैदराबाद : संपूर्ण जगभर कोविड-१९ विषाणूची लस शोधण्यासाठी धडपड सुरू आहे. तर काही देश कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रतिकार करण्यासाठी सज्ज झाली आहेत. परंतु जागतिक पर्यटन क्षेत्रावरचे मंदीचे सावट अद्यापही कायम आहे. शिवाय येत्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवासासाचा खर्चही वाढण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. असे असताना देशांतर्गत पर्यटन मात्र सुरू झाले आहे. मालदीवसारख्या काही देशांनी चालू महिन्यापासून आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आपल्या देशाची दारं खुली केली आहेत.

मालदीवची ८० टक्के अर्थव्यवस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनावरच अवलंबून आहे. छोट्या छोट्या बेटांनी बनलेला मालदीवसारखा देश विदेशी पर्यटकांना सुरक्षितता व स्वच्छतेची पूर्ण हमी देत आहे. असे असताना भारतासारख्या विस्तृत देशात आंतराष्ट्रीय सीमा बंद असल्याने देशात विदेशी पर्यटकांची आवक कमी झाली आहे. यासंबंधी वरिष्ठ पत्रकार स्मिता शर्मा यांनी माले (मालदीवची राजधानी) येथील भारतीय उच्चायुक्त संजय सुधीर यांच्याशी संवाद साधला. यावेळी संजय सुधीर यांनी आंतरराष्ट्रीय पर्यटन पून्हा सुरळीत करण्यासाठी देशाचा भूगोल तेवढाच महत्त्वपूर्ण असल्याचे स्पष्ट केले.

भारत-मालदीव दरम्यान वाहतूकीसाठी विशिष्ट ‘एअर बबल’ची संभाव्यता - भारतीय दूत

“मालदीव हा जगातील पहिला देश आहे. ज्याने विदेशी पर्यटकांसाठी आपली पर्यटन स्थळं खुली केली आहेत. मालदीवने १५ जुलैपासून पर्यटनाचे कामकाज सुरू केले. त्यासाठी जवळपास २०० रिसॉर्ट्स तयार ठेवली असून ५७- ६० रिसॉर्टमधील कामही सुरू केले आहे. तसेच मालदीव हा विखुरलेल्या बेटांचा देश असल्याने येथे कोरोना विषाणूवर सहज नियंत्रण ठेवता येऊ शकते. परंतु, दुसरीकडे मालदीवची राजधानी माले हे खूपच दाटीवाटीचे आणि गर्दीचे शहर आहे. एकदा का कोविड विषाणूचा प्रसार झाला तर तिथे विषाणूवर नियंत्रण ठेवणे फार कठीण जाऊ शकते. परंतु, त्यांनी विमानतळावर उतरणार्‍या प्रवाश्यांसाठी काही सुरक्षित योजना आखल्या आहेत. हे पर्यटक विमानतळावरून थेट बेटांवर जातात, तिथे सुट्टीचे दिवस घालवतात आणि परत थेट विमानतळावर येतात आणि आपल्या मायदेशी निघून जातात,” असे संजय सुधीर यांनी सांगितले.

किरकोळ लोकसंख्या असणाऱ्या मालदीवने गेल्या वर्षी तब्बल १.७ दशलक्ष पर्यटकांचे स्वतःच्या देशात स्वागत केले होते. ज्यामध्ये ५० हजार भारतीय पर्यटक होते. मालदीव आता विदेशी पर्यटकांचा दुसरा सर्वात मोठा गट तयार करत आहे. सध्या मालदीव आर्थिकदृष्ट्या पुनः प्राप्तीसाठी झगडत असल्याने भारताने काही मर्यादित व्यावसायिक उड्डाणे सुरू करण्याची मालदीवला अपेक्षा आहे. त्यासाठी ऑगस्टच्या मध्यापर्यंत मुंबई आणि कोचीन येथून भारतीय पर्यटकांची मालदीवसाठी उड्डाणे होतील, अशी आशा आहे. या दोन देशांत संभाव्य ‘एअर बबल’ तयार करण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे संजय सुधीर यांनी पुष्टी दिली. आम्ही जेव्हा पाचव्या क्रमांकावर होतो, तेव्हा आमचे पर्यटक दुप्पट झाले आणि आता आम्ही दुसर्‍या क्रमांकावर आहोत. परंतु, कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे आणि देशातील कोविड परिस्थितीमुळे मालदीवला येणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. यासाठी आम्ही विशिष्ट प्रकारचे काही हवाई बबल तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. या अनुषंगाने आम्ही हवाई वाहतूक मंत्रालय आणि एअर इंडियाशी सातत्याने संपर्कात आहोत. जर यावर सकारात्मक विचार झाला तर भारत आणि मालदीव दरम्यान कमीतकमी काही मर्यादित उड्डाणे आमच्याकडे येतील,” असे मालदीवच्या राजदूतांनी सांगितले.

“अशाप्रकारचा उपक्रम दोन्ही देशांच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच मालदीव हा देश विविध बेटांनी बनलेला असल्याने आणि विशिष्ट प्रकारच्या बेटांच्या संरचनेमुळे ते एक अतिशय सुरक्षित ठिकाण आहे. तिथे काही कोरोना संक्रमित क्षेत्रेही आहेत. परंतु देशाची उर्वरित ठिकाणं मात्र तुलनेने अधिकच सुरक्षित आहे, ” असेही त्यांनी सांगितले.

तथापि लोकांमध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय प्रवास करण्याचा आत्मविश्वास वाढवणे, हे जागतिक हॉस्पिटॅलिटी आणि विमान क्षेत्रातील अनेक आव्हानांपैकी एक महत्त्वाचे आव्हान बनले आहे. पर्यटनासाठी लोकप्रिय असलेले थायलंड किंवा युरोपियन देशांसारख्या ठिकाणी आता देशांतर्गत पर्यटनाद्वारेच उत्पन्न मिळवले जात आहे.

“जर्मनील खुप सारे लोक प्रथमच स्वतः च्याच देशात सुट्टी घालवत आहेत. फार काळ घरी न राहणारे बहुतांशी जर्मन लोकं इटली, स्पेन, ग्रीस सारख्या दक्षिण युरोपियन देशांमध्ये पर्यटनासाठी जात असतात. अलिकडेच स्पेनमध्ये कोरोना बाधितांची लक्षणीय वाढ झाल्याने हे देश सर्वाधिक कोरोना बाधित देशांच्या यादीत वरच्या स्थानावर आहेत. या देशांतून परतलेल्या जर्मन पर्यटकांची चाचणी केली पाहिजे की त्यांना अलग ठेवले पाहिजे ? यावर सध्या जर्मनीमध्ये चर्चा सुरु आहे. जर्मनीसाठी आशिया खंडातील केवळ थायलंड आणि व्हिएतनाम हे दोनच देश पर्यटनाच्या पोषक यादीत आहेत. सध्या जर्मन पर्यटन उद्योगास अडचणी आहेत पण त्या इतक्या जास्त नाही, जेवढ्या अपेक्षित होत्या. कारण बरेच जर्मन लोक सध्या घरीच राहत आहेत, ” असे दिल्लीतील जर्मन दूतावासाचे प्रवक्ते हांस ख्रिश्चन विंकलर यांनी स्मिता शर्मा यांच्याशी बोलताना स्पष्ट केले.

तथापि, कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी दिलेल्या सुविधांचा खर्च हा आंतरराष्ट्रीय प्रवासाच्या खर्चापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जर्मनीत येणारे बहुतेक लोक फ्रान्स, नेदरलँड्स, यूके आणि स्पेन यांसारख्या शेजारील देशांचे आहेत. तसेच जर्मनीत येणार्‍या पर्यटकांची संख्या अधिक नसली तरी सुविधा पुरवण्यावर अधिक लक्ष द्यावे लागत आहे. जसे भारतातील हॉटेल आणि रेस्टॉरंट्समध्ये जास्त ग्राहकांना घेऊ शकत नाही, अशाच प्रकारची गंभीर परिस्थिती फ्रान्समधील एअर फ्रान्स किंवा जर्मनीतील लुफ्थांसा विमान कंपन्यांची झाली आहे. या कंपन्या देशातील करदात्यांद्वारे चालवल्या जातात. म्हणूनच या कंपन्यांना दिवाळखोरीपासून वाचवण्यासाठी राज्यांनी या कंपन्यांमधील समभाग विकत घेतले आहेत.

सध्या ट्रॅव्हल ऑपरेटर आणि एअरलाइन्स क्षेत्र सर्वात कठीण परिस्थितीत आहेत. तर जर्मनीतील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स काही प्रमाणात कार्यरत आहेत पण काही नामांकित रेस्टॉरंट्स जर्मनीमध्ये बंद करावी लागली आहेत. कारण कार्यान्वित खर्च खुपच वाढला आहे. आपण ग्राहकांकडून किती किंमत घ्यायची यावरही निश्चितच काही मर्यादा आहेत. तर यांच्यातील बरेच जण खूप अडचणीच्या स्थितीत आहेत,” असेही हंस ख्रिश्चन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, काही युरोपियन देश संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत. त्यामुळे पुनर्प्राप्तीच्या मुदतीबाबत बोलणे जरा अवघड आहे.

यूएन कॉन्फरन्स ऑन ट्रेड ॲण्ड डेव्हलपमेंट (यूएनसीटीएडी) ने १ जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, जागतिक पर्यटन क्षेत्राला कमीत कमी १.२ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सचा प्रचंड फटका बसेल. हा आकडा जागतिक जीडीपीच्या १.५ टक्के एवढा आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक पर्यटन संघटनेच्या अंदाजानुसार, २०२० मध्ये भारतातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या २०१९ च्या तुलनेत २९ दशलक्षांवरून कमी होऊन १० दशलक्षांवर येईल. कोविड महामारीच्या अगोदर, २०१७ मध्ये अंदाजे ५० दशलक्ष भारतीयांनी परदेशी प्रवास केला होता. भारतीय पर्यटक सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मालदीव नेपाळ, श्रीलंका आणि भूतान या देशांना सर्वाधिक पसंती देतात. तर अलिकडच्या काळात आंतरराष्ट्रीय पर्यटन पुन्हा सुरळीत होण्याची शक्यता खुपच कमी आहे, असे मत नवी दिल्लीतील थायलंडच्या पर्यटन विभागाचे संचालक वाचीराचाई सिरीसंपन यांनी व्यक्त केले.

“सध्या थायलंडमधील देशांतर्गत पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर आले आहे. तेथील लोक देशात मुक्तपणे कुठेही फिरू शकतात. पण आंतरराष्ट्रीय पर्यटन सुरु करण्यास थोडा कालावधी द्यावा लागेल. हे सर्व कधी सुरळीत होईल हे नक्की सांगता येणार नाही. पण सध्याच्या परिस्थितीत आपण सुरक्षिततेकडे आणि आर्थिक संतुलनाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. जो प्रत्येक देशासाठी अतिशय कठीण परिस्थितीचा काळ आहे. सध्याच्या घडीला आम्ही हळूहळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आणत आहोत. तसेच थायलंडमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा वैद्यकीय उपचारांची आवश्यकता असलेल्या परदेशी रुग्णांसाठी आंतराष्ट्रीय प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात थाई पर्यटन क्षेत्राला खुप मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे, ” असे सिरिसंपन यांनी स्मिता शर्मा यांच्याशी बोलताना विशेष संवादात सांगितले.

जागतिक पर्यटन पुनरुज्जीवित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा विश्वास आणि आत्मविश्वास संपादन करणे आवश्यक आहे. त्यांनी अशी आशाही व्यक्त केली की, पर्यटकांना जर त्यांच्या पैशाच्या मोबदल्यात योग्य सेवा मिळाली, तर ते जास्तीचा पैसा खर्च करून पर्यटनासाठी आपल्या देशात नक्की येतील. “प्रत्येक देशांत, प्रत्येक हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये आता एसओपी लागू करावे लागतील. सध्या आपल्याला पुरवठा आणि मागण्यांमध्ये संतुलन राखणे आवश्यक आहे. आपण जर विविध सेवांच्या किंमती वाढवल्या तर, त्या किंमती का वाढवल्या आहेत ? त्यामागचे कारण ग्राहकांना समजले आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे. जोपर्यंत ग्राहकांना पैशांच्या मोबदल्यात उत्तम सुविधा पुरवल्या गेल्या आहेत, असे वाटेल. तोपर्यंत ते पर्यटनासाठी पैसा खर्च करण्यास तयार असतील, ” असे मतही थाई पर्यटन अधिकाऱ्याने व्यक्त केले.

ABOUT THE AUTHOR

...view details